२५ दिवस, १३०० किमी पायपीट, ८ रुग्णालयं पालथी! ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, कुटुंबाची धडपड व्यर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 03:58 PM2022-08-19T15:58:12+5:302022-08-19T15:59:51+5:30
आपल्या चिमुरड्याला वाचवण्यासाठी कुटुंबाने प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र, अखेर त्याची प्राणज्योत मालवली.
जालौर: अलीकडेच राजस्थानमधील जालौर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. एका दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने केलेल्या मारहाणीत जीव गमवावा लागला. ही घटना सायला पोलीस क्षेत्रातील सुराणा गावातील एका खाजगी शाळेतील आहे. जिथे शिक्षकाने दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली होती, त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. अनेक दिवसांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान त्याने जीव सोडला. त्या विद्यार्थाने शाळेतील शिक्षकांसाठी असलेल्या मडक्यातून पाणी प्यायल्याने ही घटना घडल्याचा आरोप केला जात आहे.
राजस्थानच्या जालौरमधील या घटनेची देशभरात चर्चा झाली. शिक्षकाच्या मारहाणीनंतर विद्यार्थ्याची प्रकृती खालावली. २० जुलैला मारहाण झाल्यानंतर जवळपास २५ दिवस उपचारांसाठी पीडित विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांची भटकंती सुरू होती. इंद्र कुमार मेघवाल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. इंद्र कुमारची प्रकृती सुधारावी यासाठी कुटुंबीयांनी गेल्या २५ दिवसांत जवळपास १ हजार ३०० किमीचा प्रवास केला. राजस्थान आणि गुजरातमधील आठ रुग्णालयांमध्ये इंद्र कुमार यांच्यावर उपचार झाले. १३ ऑगस्टला अहमदाबादमधील रुग्णालयात इंद्र कुमारचा मृत्यू झाला.
उच्चवर्णीय शिक्षकाने इंद्र कुमारला मारहाण केल्याचा आरोप
शाळेत असलेल्या माठातील पाणी प्यायल्याने उच्चवर्णीय शिक्षकाने इंद्र कुमारला मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. मारहाणीत विद्यार्थ्याला अंतर्गत जखमा झाल्या होत्या. दलित कुटुंबातील ९ वर्षांच्या इंद्र कुमारला २० जुलैला मारहाण झाली. सुराणा गावात हा प्रकार घडला. सुराणा गावातील सरस्वती विद्यामंदिर शाळेत इयत्ता तिसरीत इंद्र कुमार शिकत होता. मयत इंद्र कुमारचे काका किशोर कुमार यांनी शाळेचे संचालक छैल सिंग यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जातीवाचक शिव्या देऊन अपमानित केले आणि त्यानंतर मारहाण करून हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, कुटुंबातील सदस्यांनी इंद्र कुमारला जालौरपासून १३ किमीवर असलेल्या बगोडा येथील रुग्णालयात नेले होते. वेदना कमी झाल्यावर त्याला घरी आणले. मात्र एक-दोन दिवसांत त्रास पुन्हा वाढला. इंद्रला घरापासून ५० किमीवर असलेल्या आस्था मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी वेदना कमी झाल्याने त्याला डिस्चार्ज मिळाला. पुन्हा त्रास वाढल्याने इंद्र कुमारला घरापासून १५५ किमीवर असलेल्या दिसामध्ये दाखल करण्यात आले होते. अशी एकानंतर एक २५ रुग्णालये फिरल्यानंतरही अखेर १३ ऑगस्ट रोजी इंद्र कुमारची प्राणज्योत मालवली.