१६०० किमी पायी आलेल्या मुलाला कुटुंबाने प्रवेश नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 06:28 AM2020-04-14T06:28:09+5:302020-04-14T06:28:19+5:30
रक्ताची नाती झाली परकी : मुंबईहून वाराणसीला गेलेल्या तरुणाची कथा; पोलिसांनी केले ‘क्वारंटाईन’
वाराणसी : ‘लॉकडाऊन’मुळे रोजीरोटी बंद झाल्याने मुंबईहून १,६०० किमी चालत वाराणसीमध्ये घरी आल्यावर आई व भावाने घरात राहण्यास नकार दिल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने रविवारी या तरुणाला शहरातील इस्पितळात ‘क्वारंटाईन’ केले आहे. कोरोनाने सध्या भयग्रस्त वातावरणात रक्ताची नातीही कशी दुरावतात याची ही कथा; अशोक नावाच्या एका २५ वर्षाच्या तरुणाची आहे. अशोकचे घर वाराणसी शहराच्या गोला दिनानाथ वस्तीत आहे. चार महिन्यांपूर्वी पोट भरण्यासाठी तो मुंबईत आला. नागपाडा येथील एका हॉटेलात त्याला वेटरची नोकरी मिळाली.
जरा कुठे बस्तान बसते तोच कोरोनाची साथ सुरु झाली आणि ‘लॉकडाऊन’ सुरु झाल्यावर तो नोकरी करायचा ते हॉटेलही बंद झाले त्यामुळे अशोकने घरी परत जाण्याचे ठरविले. चांदिवली येथे अशोक जेथे राहायचा तेथील आणखी पाच मुले त्याच्याच जवळपासच्या गावातील होती. सर्वांचीच रोजीरोटी बंद झाली होती. त्या सर्वांनी एकमेकांच्या सोबतीने चालत घरी जाण्याचे ठरविले. रस्ता शोधणे कठीण असल्याने गावाला जाणारी रेल्वे ज्या वाटेने जाते त्या रेल्वेमार्गातून ते मार्गक्रमण करत राहिले.मुंबईहून निघताना अशोकने घरी कळविले नव्हते. पण वाराणसी रेल्वे स्टेशनपाशी पोहोचल्यावर मात्र त्याला राहवले नाही.
‘थोड्याच वेळात घरी येतोय’, असा त्याने आईला फोन केला. आईला आनंद होईल, आश्चर्य वाटेल, ही त्याची अपेक्षा पार धुळीला मिळाली.
‘घरी आलास तरी घरात घेणार नाही’, असे आईने त्याला सांगितले! अशोक बेजबाबदारीने वागला, असेही नाही. घरी जाण्याआधी त्याने दीनदयाल इस्पितळात जाऊन स्क्रीनिंग व तपासणी केली. कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती तरी त्यांनी अशोकला १४ दिवस घरीच ‘क्वारंटाईन’मध्ये राहण्यास सांगितले. पोलीस आता अशोकसोबत मुंबईहून चालत आलेल्या इतर पाच जणांची माहिती घेऊन त्यांना शोधून त्यांचेही स्क्रीनिंग करून चाचण्या घेण्याच्या कामाला लागले आहेत. (वृत्तसंस्था)
घराचा दरवाजाही उघडला नाही
च्अशोक मुंबईहून परत येतोय, ही बातमी वाऱ्यासारखी सर्व वस्तीमध्ये पसरली. येताना कोरोना बरोबर घेऊन आला असेल तर आपल्यालाही लागण होईल. शिवाय पोलिसांचा ससेमिरा निष्कारण मागे लागेल, असा विचार करून घरच्यांनी घरी येऊ नको, असे सांगितले होतेच. शेजाºया-पाजाऱ्यांचेही तेच मत पडले. त्यांनी अशोकच्या आगमनाची माहिती पोलिसांना कळविली.
च्अशोक घरी आला. पण आई आणि भावाने दरवाजाही उघडला नाही. बरीच विनवणी करून ते ऐकत नाहीत म्हटल्यावर अशोक वाराणसीमध्येच कटुआपुरा भागात त्याच्या आजोळी गेला.
च्तेथेही त्याला कोणी थारा द्यायला तयार झाले नाही. शेवटी एवढ्या लांब चालत आल्यावर ‘ना घर का, ना घाट का’ अशी अशोकची दयनीय अवस्था पाहून जिल्हा पोलीस प्रशासनाने रविवारी दुपारी त्याची १४ दिवसांच्या ‘क्वारंटाईन’साठी शहराच्या मैदागीन भागातील एका खासगी इस्पितळात व्यवस्था केली.
अशोकची तब्येत ठीक आहे; पण एवढ्या लांब चालत आल्याने त्याला कमालीचा थकवा आला आहे.
-महेश पांडे, पोलीस निरीक्षक, कोतवाली, वाराणसी