पूर्वी उत्तर प्रदेशात माझ्या कार्यक्रमात गोंधळ व्हायचा आता नाही, योगींचं चांगलं काम - सपना चौधरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 03:19 PM2023-12-14T15:19:03+5:302023-12-14T15:19:42+5:30
उत्तर प्रदेश आणि गुन्हेगारी हे समीकरण फार जुनं आहे.
बलिया : उत्तर प्रदेश आणि गुन्हेगारी हे समीकरण फार जुनं आहे. सततच्या गुन्हेगारीमुळे उत्तर प्रदेश हे राज्य नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था चांगली असून गुन्हेगारांना आळा बसल्याची भावना प्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरीने व्यक्त केली. बलिया येथील दादरी महोत्सवात सहभागी झालेल्या डान्सिंग क्वीनने योगी सरकारच्या कामाचे कौतुक केले. पूर्वी इथे दंगलीचे वातावरण होते आणि यूपीमध्ये येण्याची भीती वाटायची, पण आता उत्तर प्रदेशात बदल झाला. या आधी मी जेव्हा यूपीमध्ये यायचे तेव्हा कार्यक्रमात गोंधळ व्हायचा पण आता तशी परिस्थिती नाही, असेही तिने नमूद केले.
सपनाने सांगितले की, जेव्हापासून उत्तर प्रदेशात योगी सरकार आले आहे. तेव्हापासून मला सुरक्षित वाटत आहे. माझ्याशिवाय राज्यातील माता-भगिनींना पूर्णपणे सुरक्षित वाटत आहेत. विशेषतः आमच्यासारख्या कलाकारांना खूप सुरक्षित वाटत आहे. मला इथे पुन्हा पुन्हा यायला आवडेल. एका प्रश्नाच्या उत्तरात सपना चौधरी म्हणाली की, सध्या माझा राजकारणात येण्याचा कोणताही इरादा नाही आणि माझ्या करिअरबाबत मी समाधानी आहे. माझ्या करिअरला नव्या उंचीवर नेण्यात यूपी आणि बिहारने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मला इथल्या प्रेक्षकांची आणि भोजपुरी भाषेची खूप आवड आहे.
भोजपुरीतील वाढत्या अश्लीलतेबद्दल सपना म्हणाली, "सध्याचे वातावरण त्याला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे, खतपाणी घालत आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे लोक वेगवेगळ्या चवींच्या गाण्यांना प्राधान्य देत आहेत. पण माझी मातृभाषा हरियाणवी आहे आणि तिचा मला अभिमान आहे. मात्र, मला भोजपुरीही खूप आवडते. मी एक हरयाणी कलाकार आहे आणि कोणाची नक्कल किंवा कॉपी करण्याऐवजी मी नवीन डान्स स्टेप्स विकसित करून चाहत्यांची मनं जिंकते.
मला राजकारणात रस नाही - सपना
राजकारणात जाण्याच्या प्रश्नावर सपना चौधरी म्हणाली की, मला राजकारणात जाण्यात रस नाही. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. काही अपवाद वगळता बहुतांश कलाकार राजकारण करू शकत नाहीत, असे माझे वैयक्तिक मत आहे. कलाकार हा नेहमीच कलाकारच राहतो.