प्रसिद्ध विधिज्ञ फली एस. नरिमन यांचं निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 09:55 AM2024-02-21T09:55:24+5:302024-02-21T09:56:00+5:30
Fali S. Nariman Passed Away : देशातील प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील फली. एस. नरिमन यांचं आज दिल्लीमध्ये निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते.
देशातील प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील फली. एस. नरिमन यांचं आज दिल्लीमध्ये निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. फली एस. नरिमन यांनी नोव्हेंबर १९५० मध्ये मुंबई हायकोर्टामधून वकिलीला सुरुवात केली होती. तसेच १९६१ मध्ये त्यांना वरिष्ठ वकिल म्हणून नामांकित करण्यात आले होते. त्यांनी ७० पेक्षा अधिक वर्षे वकिली केली. सुरुवातीला मुंबई हायकोर्टात आणि नंतर १९७२ पासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली.
भारताची राज्यघटना आणि न्याय व्यवस्तेवर असलेली त्यांची पकड पाहता १९७५ मध्ये त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्याच वर्षी जून महिन्यात पंतप्रधान इंदिर गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं आणीबाणी लागू केली. त्यामुळे या आणीबाणीविरोधात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
फली एस. नरिमन यांना १९९१ मध्ये पद्मभूषण आणि २००७ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांची कायद्यावर पकड होती. त्यासोबतच ते एक उत्तम लेखक होते. त्यांनी द स्टेट ऑफ नेशन, गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट या पुस्तकांसह बिफोर मेमोरी या आत्मचरित्राचं लेखन केलं होतं.