चहा विक्रीच्या कमाईतून बचत करत परदेशवारी करणाऱ्या आजोंबांचं निधन; २६ देशांची केली होती सैर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 07:33 PM2021-11-21T19:33:14+5:302021-11-21T19:33:42+5:30
चहा विक्रीतून मिळणाऱ्या पैशांमधून ३०० रूपयांची बचत करून दांपत्य करत होतं परदेशवारी.
चहा विक्रीच्या कमाईतून पैशांची बचत करत आपल्या पत्नीसह २६ देशांची सैर करणाऱ्या आजोबांचं शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. के.आर.विजयन (KR Vijayan) असं त्यांचं नाव असून ते कोच्चीतील एका चहाच्या दुकानाचे मालक होते. ते ७१ वर्षांचे होते. ते आणि त्यांच्या पत्नी मोहना या मिळून श्री बालाजी कॉफी हाऊस नावाचं एक चहाचं दुकान चालवत असत. या ठिकाणी चहाच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून थोडी बचत करुन हे दांपत्य जगची सैर करत होतं. त्यामुळे हे सर्वांमध्ये प्रसिद्ध झाले होते. नुकतेच ते रशियाचा दौरा करून परतले होते.
हे दांपत्य चहाच्या विक्रीतून होणाऱ्या कमाईमधील दररोज ३०० रूपयांची बचत करत असतं. अशातूनच त्यांनी पैसे जमवून २००७ मध्ये पहिल्यांदा इस्रायलचा दौरा केला होता. दरम्यान गेल्या १४ वर्षांमध्ये त्यांनी २६ देशांचा प्रवास केला होता. तसंच काही वेळा त्यांनी या परदेशवारीसाठी छोटं कर्जही घेतलं होतं.
This time he had a solo travel leaving her behind.#KRVijayan#Mohana#Kochi#Kadavanthara#SreeBalajiCoffeeHousepic.twitter.com/rMZmmsG1qx
— Farha Zulthana (@FaraKonnakkal) November 19, 2021
या दांपत्यानं २७ वर्षांपूर्वी १९९४ मध्ये आपल्या दुकानाची सुरूवात केीली होती. कोरोना महासाथ येण्यापूर्वी या दांपत्यानं २५ देशांची सैर केली होती. तसंच यावेळी त्यांनी रशियाच्या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला होता. हे दांपत्य २१ ते २८ ऑक्टोबर दरम्यान रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. काही दिवसांपूर्वी विजयन यांच्याशी वृत्तसंस्था एएनआयनंही संवाद साधला होता.
"कोरोना महासाथीनंतर पर्यटन स्थळं पुन्हा सुरू करण्यात आली. जेव्हा ट्रॅव्हल एजंटनं मला पुढील दौरा हा रशियाचा असेल असं सांगितलं तेव्गा मी त्यांना या यादीत आमचंही नाव जोडण्यास सांगितलं. हा दौरा २१ ते २८ ऑक्टोबर दरम्यान असेल," असं विजयन एएनआयशी संवाद साधताना म्हणाले होते. तसंच त्यांच्या पत्नीनंही कोरोनामुळे सर्वांसमोर अनेक समस्या आल्या, परंतु आता पुन्हा प्रवासाची वेळ आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.