वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पराभव होताच फॅन्स संतप्त; दुकानातून TV उचलला अन् फोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:58 AM2023-11-20T08:58:32+5:302023-11-20T09:08:38+5:30
सामना संपताच भारतीय दु:खी झाले, नाराज झाले तर काही संतप्त देखील झाल्याचं पाहायला मिळालं.
सलग दहा सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेली रोहित शर्मा अँड टीम जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून हरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहरुख, रणवीर यांच्यासह बॉलिवूडचे स्टार्स अन् दीड लाख प्रेक्षकांच्यासमोर ऑस्ट्रेलियाने कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा केला. ट्रॅव्हिस हेडने मॅच विनिंग शतकी खेळी केली आणि त्याला मार्नस लाबुशेनची दमदार साथ मिळाली. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वन डे वर्ल्ड कप उंचावला. 12 वर्षानंतरही भारताची वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा अपूर्ण राहिली.
सामना संपताच भारतीय दु:खी झाले, नाराज झाले तर काही संतप्त देखील झाल्याचं पाहायला मिळालं. याच दरम्यान धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये काही तरुणांनी रागाच्या भरात दुकानातून टीव्ही उचलला आणि बाहेर आणून फेकून देत तो फोडला. याचा व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एखादा सामना हारल्यानंतर टीव्ही फोडल्याच्या घटना पाकिस्तानमधून अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र आता भारतातही असंच काहीस घडलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण टीव्हीच्या दुकानात उभं राहून सामना पाहत आहेत. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकताच दोन तरुणांनी दुकानात ठेवलेला टीव्ही उचलला आणि थेट बाहेर जाऊन त्यांची तोडफोड केली. यावेळी दुकानदार त्यांना हे करू नका असे वारंवार सांगत होते. मात्र दोघांनीही कोणाचच ऐकलं नाही. भारतीय संघामुळेच आम्ही सामना हरलो, असं ते रागाने बोलत होते. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्ल्ड कप फायनलचा पहिला टप्पा गाजवला. रोहित शर्माच्या (47) आक्रमक सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या 10 षटकांत 2 बाद 80 धावा फलकावर चढवल्या होत्या. पण, शुबमन गिल ( 4) व श्रेयस अय्यर ( 4) हे अपयशी ठरले. विराट कोहली ( 54) व लोकेश राहुल ( 66) यांनी 109 चेंडूंत 67 धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजा ( 9), मोहम्मद शमी ( 6), सूर्यकुमार यादव ( 18), जसप्रीत बुमराह (1), कुलदीप यादव ( 10) व मोहम्मद सिराज ( 9) यांनी थोडा हातभार लावला. 11 ते 40 षटकांत भारतीय फलंदाजांना केवळ 4 चौकार मारता आले. भारताचा संपूर्ण संघ 240 धावांत तंबूत परतला.