राज्यसभेतील 72 सदस्यांना निरोप, राऊतांसह महाराष्ट्रातील 8 जणांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 07:12 AM2022-04-01T07:12:32+5:302022-04-01T07:13:26+5:30
सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसदीय पद्धती मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
नवी दिल्ली : एरवी एकमेकांवर आरोप करणाऱ्या विविध पक्षांच्या सदस्यांनी राजकीय मतभेद विसरून संसदीय परंपरा अधिक दृढ करण्यासाठी सत्तारूढ व विरोधकांच्या योगदानाच्या भूमिकेचे समर्थन केले. गुरुवारी राज्यसभेचे कोणतेही इतर कामकाज न होता सदस्यांना निरोप देण्यात आला.
येत्या तीन महिन्यांत राज्यसभेतून ७२ सदस्य निवृत्त होत आहे. यात महाराष्ट्रातील आठ सदस्यांचा समावेश आहे.
सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसदीय पद्धती मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भाषण करताना ते एकदा भावुकही झाले होते. सर्वच पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांबद्दल प्रेम, आदर व सद्भावना व्यक्त केली. संसदीय पद्धती मजबूत करण्यासाठी सत्तारूढ व विरोधी पक्षांच्या भूमिकेचे महत्त्वही अधोरेखित केले. यावेळी भाषण करताना मावळते सदस्य डॉ. विकास महात्मे यांनी राजकारण आपण लोकनीतीसारखे केल्याचा उल्लेख केला. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी संसदीय कामकाजात सुधारण्याच्या सूचना केल्या.
छत्रपती संभाजी व डॉ. सहस्रबुद्धेंचा गौरव
सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी छत्रपती संभाजीराजे व डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या सखोल व अभ्यासपूर्ण योगदानाचा विशेष उल्लेख केला.
महाराष्ट्रातील सदस्य
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, डॉ. विनय सहस्रबुद्धे, डॉ. विकास महात्मे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, शिवसेनेचे नेते संजय राऊत तसेच राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित झालेले छत्रपती संभाजीराजे व डॉ. नरेंद्र जाधवसुद्धा निवृत्त होत आहेत. यावेळी बोलताना सभागृहाचे नेते पीयूष गोयल यांनी विरोधकांच्या भूमिकेचेही समर्थन केले.
ज्ञानापेक्षाही अनुभवी सदस्यांचे योगदान महत्त्वाचे -मोदी
‘राज्यसभेत असलेल्या अनेक सदस्यांकडे संसदीय कामाचा मोठा अनुभव आहे. अनेकदा ज्ञानापेक्षा व्यक्तीचा अनुभव समाजाचे जीवन समृद्ध करण्यात मोठी भूमिका बजावतात. संसदीय प्रणाली शाबूत राखण्यात या अनुभवाचे निश्चित मोठे योगदान आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केले. राज्यसभेतून एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ७२ सदस्य निवृत्त होत आहेत. या सर्व सदस्यांना राज्यसभेत निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘ज्ञानाचे महत्त्व मर्यादित आहे. ते चर्चासत्रात कामी येते.