14 एकरांचा महाल, 18 विंटेज कार आणि 1000 कोटींचे दागिने; 30 वर्षानंतर कायदेशीर लढाईचा अंत...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 05:58 PM2022-09-07T17:58:55+5:302022-09-07T17:59:03+5:30
पंजाबच्या फरीदकोटचे महाराजा हरिंदर सिंग ब्रार यांची 20 हजार कोटींची संपत्ती मुलींच्या नावे करण्यात आली आहे.
मोहाली: पंजाबमधील एका मालमत्तेची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती, आज त्या संपत्तीचा वाद अखेर संपला. गेल्या 30 वर्षांपासून मालमत्तेचा सुरू होता. हा वाद फरीदकोटचे महाराजा सर हरिंदर सिंग ब्रार यांच्या शाही संपत्तीचा आहे. या मालमत्तेची किंमत 5-10 कोटी नाही, तर 20 हजार ते 25 हजार कोटींपर्यंत आहे. आता सुप्रीम कोर्टाने या संपत्तीवर हरिंजर सिंग ब्रार यांच्या मुलींचा हक्क सांगितला आहे. या मालमत्तेवर आधी दावा कोणी केला आणि 30 वर्षांच्या लढाईत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात कसे पोहोचले, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, जाणून घेऊ महाराजा हरिंदर सिंग आणि त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती.
सुप्रीम कोर्टाने बुधवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत 30 वर्षांची लढाई संपवली. उच्च न्यायालयाच्या निर्णयात महाराजा हरिंदर सिंग यांच्या मुली अमृत कौर आणि दीपिंदर कौर यांना शाही संपत्तीत मोठा वाटा देण्यात आला आहे. सुमारे महिनाभरापूर्वी न्यायमूर्ती यू यू ललित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि मृत्युपत्र इत्यादी तपासून निर्णय राखून ठेवला होता.
भांडण कोणाबरोबर होते?
मुलींना हक्क मिळण्यापूर्वी ही मालमत्ता कोणाकडे होती? पूर्वी ही मालमत्ता महारावल खेवाजी ट्रस्टकडे होती आणि ते या मालमत्तेची काळजी घेत होते. महारावल खेवाजी ट्रस्टने संपत्तीवर मृत्यूपत्राच्या आधारे हक्क सांगितला होता. पण, 2013 मध्ये चंदिगड जिल्हा न्यायालयाने हे मृत्यूपत्र बेकायदेशीर ठरवून मुलींना मालमत्ता दिली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्यात आले, जिथे 2020 मध्ये जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. मात्र, मुलींसोबतच त्यांच्या भावाच्या कुटुंबीयांनाही वाटा द्यावा, असे न्यायालयाने म्हटले होते.
किती मालमत्ता होती?
या प्रचंड मालमत्तेत किल्ले, इमारती, शेकडो एकर जमीन, दागिने, गाड्या आणि मोठा बँक बॅलन्सचा समावेश आहे. यामध्ये फरीदकोटचा राजमहल (14 एकर), फरीदकोट किल्ला मुबारक (10 एकर), नवी दिल्लीचे फरीदकोट हाऊस (अंदाजे किंमत 1200 कोटी), चंदीगडचा मणिमाजरा किल्ला (4 एकर), शिमलाचे फरीदकोट हाऊस (260 बिघा बंगला), 18 विंटेज कार (रॉयस, बेंटले, जग्वार इत्यादी), 1000 कोटींचे सोने आणि रत्ने यांचा समावेश आहे.