शेतकऱ्याने बांधलं 'प्रेमाचं मंदिर', 12 वर्षापासून करतोय पत्नीची पूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 12:55 PM2018-02-23T12:55:01+5:302018-02-23T12:55:21+5:30
कर्नाटकातील राजूस्वामी उर्फ राजू या शेतकऱ्याने बांधलेलं प्रेममंदिर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
छमाराजनगर- प्रेमामध्ये सर्व हद्दी पार केल्या जातात असं आपण नेहमीच ऐकतो. तसंच पत्नीने एखादी गोष्ट मागितली तर ती देण्यासाठीही पती नेहमी प्रयत्न करतो. याचच एक उदाहरण कर्नाटकमध्ये पाहायला मिळतं आहे. कर्नाटकातील राजूस्वामी उर्फ राजू या शेतकऱ्याने बांधलेलं प्रेममंदिर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. राजूस्वामी यांनी बांधलेल्या मंदिरात त्यांनी भगवान शंकर व अन्य देवतांसोबत त्यांच्या पत्नीलाही जागा दिली आहे. राजू यांनी पत्नीची मुर्ती तयार केली असून ते गेली १२ वर्षे दररोज पत्नीची पूजा करत आहेत. राजूस्वामी यांनी बांधलेल्या या प्रेममंदिराची सगळीकडेच चर्चा होत असून आजूबाजूच्या गावातील लोकही कृष्णापूरामध्ये येऊन मंदिराबद्दल विचारत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
राजूस्वामी यांनी 2006मध्ये हे मंदिर बांधलं असून गेली 12 वर्ष ते मंदिरात पत्नीची पूजा करत आहेत. राजम्मा असं राजूस्वामी यांच्या पत्नीचं नाव आहे. मंदिरामध्ये शनिश्वर, सिद्धप्पाजी, नवग्रव, शंकर या देवांच्या मुर्तींबरोबर त्यांनी पत्नीच्या मुर्तीची स्थापना केली आहे.
येलंदूर तालुक्यातील कृष्णपुरा गावात राहणाऱ्या राजू यांची गावात तीन एकरची शेती आहे. राजू यांनी बहिणीच्या मुलीशीच लग्न केलं. आई-वडिलांचा लग्नाला विरोध होता पण काही काळाने त्यांचा विरोधही मावळला. विशेष म्हणजे बहीण व तिच्या नवऱ्यानेही राजू यांच्या लग्नाला विरोध केला नाही. लग्नानंतर पत्नी राजम्माने राजू यांना स्वतःचं मंदिर असावं, अशी इच्छा बोलून दाखविली होती. पण मंदिर बांधण्यापूर्वीच राजम्मा यांचं निधन झालं. मग राजू यांनी मंदिराची उभारणी करत त्यात इतर देवांबरोबर राजम्मा यांना स्थान देण्याचा निर्णय घेतला. मंदिरात देवांच्या मुर्तीबरोबर पत्नीच्या मुर्तीला स्थान दिल्याने सुरूवातीला अनेक लोकांनी त्याला विरोध केला व राजू यांनी लोकांच्या विरोधाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.
राजम्माला तिच्या मृत्यूची पूर्वकल्पना आली असवी. तिच्याकडे विशेष शक्तीच होती. ती नेहमी फक्त मंदिराचा विचार करायची. ती खूपच धार्मिक होती, असं राजू स्वामी यांनी सांगितलं. पत्नीच्या याच इच्छाशक्तीमुळे मी मंदिर बांधायचा विचार केला. व आता त्या मंदिरात मी पत्नीच्या मुर्तीची पूजा करतो आहे, अशी भावना राजू यांनी व्यक्त केली.