"...तर आतापर्यंत बुलडोझर चालवला गेला असता"; फरार भाजपा नेत्यावर संतापली शेतकऱ्याची लेक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 04:34 PM2023-10-10T16:34:20+5:302023-10-10T16:35:03+5:30

फरार नेता आशू दिवाकर याच्यावरील बक्षिसाची रक्कम पोलिसांनी एक लाख रुपये केली आहे.

farmer case deceased daughter angry absconding bjp leader bulldozer action reward announced | "...तर आतापर्यंत बुलडोझर चालवला गेला असता"; फरार भाजपा नेत्यावर संतापली शेतकऱ्याची लेक

फोटो - आजतक

कानपूर शहरातील प्रसिद्ध शेतकरी बाबू सिंह यादव यांच्या आत्महत्येप्रकरणी फरार असलेला भाजपा नेता आशू दिवाकर गेल्या महिनाभरापासून पोलिसांना सापडलेला नाही. पोलीस छापे टाकत आहेत, मात्र भाजपा नेत्याचा पत्ता लागलेला नाही. अशा स्थितीत अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत.

आत्महत्या प्रकरणातील आरोपींना अटक न केल्याने कानपूर पोलिसांवर दबाव वाढत आहे. दरम्यान, फरार नेता आशू दिवाकर याच्यावरील बक्षिसाची रक्कम पोलिसांनी एक लाख रुपये केली आहे. यापूर्वी ही रक्कम 50 हजार होती. मंगळवारी पीडित कुटुंबीय आयुक्त कार्यालयात पोहोचले होते. आरोपी आशू दिवाकरचे घर जप्त करून त्यावर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली होती.

भाजपाचा स्थानिक नेता आशू दिवाकरने एका शेतकऱ्याची सहा कोटी रुपयांची जमीन हडप करून एका व्यावसायिकाला विकल्याचा आरोप आहे. जमिनीच्या मोबदल्यात आशूने शेतकऱ्याला 6 कोटी 20 लाख रुपयांचा खोटा चेक दिला होता. नंतर तो चेक परत घेण्यात आला. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं.

या घटनेला एक महिना उलटून गेला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची मुलगी न्यायासाठी याचना करत आहे. आज पोलीस कार्यालयात शेतकरी बाबूसिंग यादव यांची मुलगी रुबी आयुक्तांना भेटली. "माझ्या वडिलांच्या जागी भाजपाचा नेता असता तर आतापर्यंत बुलडोझर चालवला गेला असता" असं रूबीने म्हटलं आहे. 

आरोपीवर गँगस्टर कायद्यांतर्गत कारवाई करून त्याची मालमत्ता जप्त करण्यात यावी, असं रुबीचं म्हणणं आहे. तसेच त्याला लवकरात लवकर अटक करावी. त्याचवेळी कुटुंबासोबत आलेले समाजवादी पक्षाचे नेते फतेह बहादूर गिल यांनीही सांगितले की, कानपूर पोलिसांनी आरोपींच्या घरावर बुलडोझर फिरवण्याचे काम केले पाहिजे जेणेकरून त्यांना विश्वास वाटेल की उत्तर प्रदेश सरकार गुन्हेगारांवर कारवाई करतं. 

याप्रकरणी सहआयुक्त आनंद प्रकाश तिवारी म्हणाले की, आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बक्षिसाची रक्कम वाढवून एक लाख करण्यात आली आहे. आरोपीच्या भावाचीही आम्ही चौकशी करू कारण तो साक्षीदार आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: farmer case deceased daughter angry absconding bjp leader bulldozer action reward announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.