कडक सॅल्यूट! शाळेसाठी शेतकऱ्याने सरकारला दान केली तब्बल 8 लाखांची जमीन, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 02:54 PM2023-06-20T14:54:09+5:302023-06-20T14:59:52+5:30
एका शेतकऱ्याने शाळा बांधण्यासाठी मदत म्हणून त्याच्या संपत्तीतील काही जमीन भेट दिली आहे. त्याची ही गोष्ट सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे.
भारतात जमिनीचे वाद हे अनेकदा समोर येत असतात. पण असं असताना आता एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. बिहारमधील एका शेतकऱ्याने शाळा बांधण्यासाठी मदत म्हणून त्याच्या संपत्तीतील काही जमीन भेट दिली आहे. त्याची ही गोष्ट सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर जिल्ह्यातील बिहपूर ब्लॉकमधील कहारपूर गावातील शेतकरी सुबोध यादव यांनी आपली जमीन एका उदात्त कारणासाठी समर्पित करून एक चांगला आदर्श ठेवला आहे.
माध्यमांशी बोलताना या शेतकऱ्याने सांगितले की, त्याची आई चंडिका देवी यांच्या विनंतीवरून त्यांनी शाळेच्या बांधकामासाठी हातभार लावला. बिहार सरकारला जमीन दान करण्याचा निर्णय घेतला. दिलेल्या जमिनीची किंमत आठ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहपूर ब्लॉकमधील कहारपूर हे गाव भागलपूर जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 45 किमी अंतरावर आहे. कोसी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने 2020 मध्ये शाळा बुडली. परिसरात ही एकमेव सार्वजनिक शाळा होती.
जवळ शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये जाण्यास भाग पाडले गेले. शाळेची इमारत मोडकळीस आल्यानंतर अधिकाऱ्यांनी शाळा बांधण्यासाठी नवीन जागेचा शोध घेतला. ही बाब शेतकऱ्याची आई चंडिका देवी यांना कळताच त्यांनी आपल्या मुलाला ही मालमत्ता सरकारला दान करण्यास सांगितले. कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जमीन भेट देण्यात आली.
शेतकऱ्याने पुढे सांगितले की, या गावातील मुलांना अभ्यासात खूप त्रास होतो. त्यामुळे आम्ही शाळेसाठी जमीन दान करून माझ्या आईचं नाव देण्याचा निर्णय घेतला. ज्या व्यक्तीने शाळा उभारली, ही संपत्ती उपलब्ध करून देणारी व्यक्ती म्हणून मुलं आता आईची आठवण ठेवतील. भागलपूरचे डीईओ संजय कुमार यांनी सुबोध यादवने शाळेला आपल्या आईचे नाव देण्याची विनंती केली होती, असा खुलासा केला. या महान कार्याबद्दल त्यांनी शेतकरी व त्याच्या आईचे अभिनंदनही केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.