पिकाचं नुकसान केलं म्हणून शेतक-याने केली माकडाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 04:26 PM2018-02-19T16:26:49+5:302018-02-19T16:26:58+5:30
शेतातील उभ्या पिकाचं नुकसान केल्याबद्दल संतप्त झालेल्या शेतक-याने माकडाला झाडाला लटकवून मारहाण करत हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे
भोपाळ - शेतातील उभ्या पिकाचं नुकसान केल्याबद्दल संतप्त झालेल्या शेतक-याने माकडाला झाडाला लटकवून मारहाण करत हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. बिरजू ओझा असं या 38 वर्षीय शेतक-याचं नाव आहे. बेतूल जिल्ह्यात ही घटना घडली असून बिरजू ओझा यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयात त्यांनी हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उपविभागीय वनअधिकारी राखी नंदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, माकडाने पिकांचं नुकसान केल्याने बिरजू ओझा यांचा संताप झाला होता. या संतापातच त्यांनी माकडाला ठार केलं.
बेतूल गावातील शहापुरा परिसरात दोन आठवड्यांपुर्वी एका माकडाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. शवविच्छेदन अहवालानंतर माकडाला झाडाला लटकवून बेदम मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं होतं. मारहाणीमुळे झालेल्या रक्तस्त्रावानंतर माकडाचा मृत्यू झाल्याचं यावेळी निष्पन्न झालं.
यानंतर वनविभागाने तपासाला सुरुवात केली. तपास करता करता अधिकारी बिरजू ओझा यांच्या चिंचोळी गावात पोहोचले. गावक-यांकडे चौकशी केली असता माकडांच्या एका टोळक्याने बिरजूच्या पिकांचं नुकसान केल्याची माहिती हाती आली. 'माकडाला झाडाला लटकवलं तर बाकीची माकडं शेताकडे फिरकणार नाहीत असं बिरजूला वाटलं होतं. यामुळेच त्याने माकडाला पकडलं, त्यानंतर मारहाण करत त्याला झाडाला लटकवून ठेवलं', अशी माहिती अधिका-याने दिली आहे.