Agricultural Law : कृषी कायद्यांबाबत केंद्राशी चर्चा करण्यास तयार : राकेश टिकैत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 06:09 AM2021-07-11T06:09:04+5:302021-07-11T06:10:55+5:30
केंद्राची इच्छा असल्यास चर्चेस तयार, टिकैत यांचं वक्तव्य. चर्चेतून मार्ग न निघाल्यास २२ जुलैपासून आंदोलनाचा इशारा.
नवी दिल्ली : कृषी कायद्यांवर चर्चा करण्याची केंद्र सरकारची इच्छा असेल तर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. मात्र, चर्चेतून मार्ग न निघाल्यास २२ जुलैपासून आमचे २०० लोक संसदेजवळ धरणे आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
टिकैत म्हणाले की, आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, मात्र ही चर्चा कोणत्याही अटींशिवाय व्हायला हवी. केंद्र सरकार आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. त्यावर टिकैत यांनी हे मत व्यक्त केले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या घटनेचा उल्लेख करून टिकैत म्हणाले की, "आम्ही असे म्हणालोच नाही की, कृषी कायद्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांकडे मांडू. २६ जानेवारीबाबतच्या एका प्रश्नाचे उत्तर मी दिले होते की, एखादी तपास संस्था या घटनेची निष्पक्ष चौकशी करू शकते का? आणि नसेल तर आम्ही हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांकडे घेऊन जाऊ शकतो का?"