Rakesh Tikait : "असदुद्दीन ओवेसी हे भाजपापेक्षा जास्त धोकादायक, समाजात फूट पाडण्याचं करताहेत काम"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 09:07 AM2021-12-27T09:07:20+5:302021-12-27T10:09:04+5:30
Rakesh Tikait And Asaduddin Owaisi : राकेश टिकैत यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आले. केंद्राने हे कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर शेतकरी आंदोलन संपवून माघारी परतले आहेत. पण असं असताना आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन सुरू होऊ शकतं, असा सूचक इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी दिला आहे. तसेच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "असदुद्दीन ओवेसी हे भाजपापेक्षा जास्त धोकादायक आहेत" असं म्हटलं आहे.
राकेश टिकैत यांनी सरकारने सध्या फक्त तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. उर्वरित मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. आश्वासनांची पूर्तता न केल्यास पुन्हा आंदोलन होऊ शकतं असं म्हटलं आहे. यासोबतच असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "केंद्र सरकारने सध्या केवळ तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. मात्र त्यांनी एमएसपी बाबत कायदा केलेला नाही. समिती स्थापन करण्याबाबत सरकार निश्चितपणे बोलले आहे, पण सरकार अतिशय संथ गतीने काम करत आहे. आमची आश्वासने पूर्ण न झाल्यास शेतकरी पुन्हा आंदोलन करू शकतात" असं म्हटलं आहे.
"ओवेसींसारख्या लोकांपासून जनतेने सावध राहावं"
"ओवेसी हे भाजपापेक्षा जास्त धोकादायक असून समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत. ओवेसींसारख्या लोकांपासून जनतेने सावध राहावं" असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आता संयुक्त किसान मोर्चाची काय भूमिका असेल? तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले राकेश टिकैत आताही विविध राज्यांमध्ये जाऊन भाजपाविरोधात प्रचार करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वत: राकेश टिकैत यांनी दिली आहेत. काही दिवसांपूर्वी राकेश टिकैत यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली होती.
"सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करू"
"जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करू. तसेच मी उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या भागांमध्ये जाणार आहे. मला कुणीही अडवू शकत नाही. टिकैत पुढे म्हणाले की, आंदोलन यशस्वी ठरल्याचे समाधान चेहऱ्यावर आहे. एक समाधानाची भावना आहे, ही एकप्रकारे विजय यात्राच आहे. आता सरकारशी करार झाला आहे. सरकारबाबत कुठलीही कटुता आमच्या मनात नाही. मात्र पुढे काय निर्णय घेतले जातील, हे येणारा काळच ठरवेल. आता शेतकऱ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने राहावे आणि शेतीवर लक्ष द्यावे" असे आवाहन राकेश टिकैत यांनी केले आहे.