पाच महिने, 1500 किमी प्रवास; शेतकऱ्याची हरविलेल्या मुलासाठी सायकलवरून शोधमोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 02:21 PM2017-12-02T14:21:00+5:302017-12-02T14:21:40+5:30
हथरस जिल्ह्यात राहणारे सतिश चंद हे 48 वर्षीय शेतकरी आपल्या मुलाचा शोध घेत आहेत.
आगरा- हथरस जिल्ह्यात राहणारे सतिश चंद हे 48 वर्षीय शेतकरी आपल्या मुलाचा शोध घेत आहेत. सहा महिन्यापूर्वी सतिश यांचा अकरा वर्षीय दिव्यांग मुलगा अचानक बेपत्ता झाला आहे. त्या मुलाला शोधण्यासाठी सतिश यांनी सायकलवरून शोधमोहीम सुरू केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची मदत न घेता अजूनही सतिश यांची ही शोधमोहीम सुरू आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
चंद यांनी दिल्ली आणि हरियाणातील विविध भागात सायकलीवर जाऊन मुलाचा शोध घेतला. अजूनही विविध भागात त्यांचा सायकलीवरून प्रवास सुरू आहे. आम्ही हथरस जिल्ह्यातील द्वारकापूर या गावातील राहणारे आहोत. 24 जून रोजी गोडना हा माझा मुलागा शाळेत जाण्यासाठी घरातून निघाला. शाळा घरापासून एक किलोमीटर दूर आहे. शाळेत गेलेला मुलगा संध्याकाळी घरी आला नाही. म्हणून मी त्याला शोधण्यासाठी शाळेत गेलो पण तो तेथे नव्हता. सस्नी रेल्वे स्टेशनच्या जवळ गोडनाला पाहिलं असल्याचं त्याच्या वर्गमित्रांनी सांगितलं.मी तेथेही जाऊन पाहिलं पण मला तो दिसला नाही. चार दिवस मी स्वतः त्याचा शोध घेतल्यानंतर शेवटी 28 जून रोजी पोलीस स्टेशन गाठलं. पण तेथे गेल्यावर पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिला. माझ्या सततच्या विनंती नंतर त्यांनी तक्रार नोंदवून घेतली व मला जाण्यास सांगितलं. पण मला स्वस्थ बसवत नसल्याने मी माझी सायकल काढून मुलाचा शोध सुरू केला. रस्त्याने जाताना प्रत्येकाला मुलाचा फोटो दाखवून मुलाबद्दलची विचारणा केली. माझ्याकडे पैसे कमी आहेत तसंच योग्य सोयी नाहीत. त्यामुळे मदत कोण करणार ? हा मोठा प्रश्न आहे.
चंद यांनी आत्तापर्यंत सायकलवरून 1500 किमीचा प्रवास केला आहे. दिल्लीपासून ते कानपूरपर्यंत आणि हरियाणातील रेवारीमध्ये त्यांनी मुलाला शोधलं. पण अजून त्यांच्या हाती काहीही लागलं नाही. आत्तापर्यंत 100 गावं पालथी घातली आणि मुलाचा फोटो हजारापेक्षा जास्त स्थानिकांना दाखविला, असं सतिश चंद म्हणाले आहेत.
इतमादपूरमध्ये असलेल्या बरहान गावातील काही नागरिकांनी एका व्यक्तीला हातात मुलाचा फोटो घेऊन सायकलवरून जाताना पाहिलं होतं. सतिश चंद यांची ही कहाणी आगऱ्यातील एका बाल हक्क कार्यकर्ते नरेश पारस यांच्याकडे पोहचली. चंद यांची तक्रार नरेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून यूपी पोलिसांच्या लक्षात आणून दिली. यानंतर चंद यांच्या तक्रारीसाठी उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुलाच्या शोधासाठी आदेश दिले.
मुलाला शोधण्यासाठी या पद्धतीचा का अवलंब केला असा प्रश्न लोक मला विचारत आहेत. पण मुलाला गमावण्याचं दुःख त्यांना समजत नाहीये. माझी पत्नी अजूनही मुलाच्या प्रतिक्षेत आहे. 2005मध्ये आजारपणाने आमच्या मोठ्या मुलीचं निधन झालं. त्यानंतर 2011मध्ये एका अपघातात आमच्या नऊ वर्षाच्या मुलाचं निधन झालं. आता गोडना हा एकुलता एक आसरा होता. त्यामुळे त्याच्याशिवाय कसं जगायचं? हा प्रश्न आम्हाला सतावतो आहे, अशी भावना सतिश चंद यांनी व्यक्त केली आहे.
चंद यांनी काही जिल्ह्यामध्ये मुलगा हरविल्याची पत्रकं दिली आहेत. तसंच तेथिल चहा विक्रेत, रेल्वे स्टेशन, बस स्टॉपच्या बाजूला असणाऱ्या दुकानदारांचे नंबर घेतले आहेत. मुलगा सापडल्याचा फोन कोणीतरी करेलच याची अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.