Farmer Protest: अस्लम शेख यांनी घेतली दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 06:50 PM2021-02-08T18:50:30+5:302021-02-08T18:52:09+5:30
Farmer Protest: करार शेतीचे आजवर जेवढे प्रयोग देश-विदेशात झाले ते सर्व फसल्याची उदाहरणं ताजी असताना पुन्हा नव्याने काही बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी 'करार शेतीचा' घाट घातला जातो आहे.
नवी दिल्ली : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज आंदोलनाच्या ७५ व्या दिवशी सिंधु बाॅर्डरवर जावून केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारतीय किसान युनियन चे नेते राकेश टिकैत यांना आश्वस्त केले की, अन्नदात्या बळीराजासोबत काॅंग्रेस पक्ष सदैव खंबीरपणे उभा आहे.
माध्यमांशी बोलतांना अस्लम शेख यांनी केंद्र सरकारवर सडाडून टीका केली. केंद्र सरकारने मंजूर केलेले हे तीन कायदे शेतकऱ्यांना स्वत:च्याच भूमित मजूर बनवणारे आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किमान समर्थन मुल्य देणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्था संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.
करार शेती'चे आजवर जेवढे प्रयोग देश-विदेशात झाले ते सर्व फसल्याची उदाहरणं ताजी असताना पुन्हा नव्याने काही बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी 'करार शेतीचा' घाट घातला जातो आहे. १९५५ चा अत्यावश्यक वस्तू कायद्यात बदल करुन बड्या कंपन्यांना साठेबाजीसाठी केंद्र सरकारने रान मोकळं करुन दिलं आहे असा आरोप त्यांनी केला.
गोर-गरीब जनतेच्या मतांवरती सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला आज तेच गोरगरीब खलिस्तानी व आतंकवादी वाटू लागलेत यापेक्षा शोकांतिका ती काय असा सवाल करत हेच शेतकरी बांधव मोदी सरकारला त्यांची जागा दाखवून देतील असंही अस्लम शेख शेवटी म्हणाले.