चौथी बैठक निष्फळ, आंदोलन चिघळले; बॅरिकेड तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी आणल्या JCB मशीन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 08:39 PM2024-02-20T20:39:20+5:302024-02-20T20:41:13+5:30
सरकारने शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांचा प्रस्ताव मांडला, मात्र त्यांनी त्यास नकार दिला.
Farmer Protest Delhi: गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. किमान आधारभूत किमती(MSP)सह डझनभर मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता दिल्लीत घुसण्याची तयारी सुरू केली आहे. रविवारी शेतकरी आणि सरकार यांच्यात चौथ्या फेरीची बैठक झाली, त्यात सरकारने शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांचा प्रस्ताव मांडला, मात्र यावर एकमत झाले नाही. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी दिल्ली मोर्चाची तयारी सुरू केली आहे.
आंदोलक शेतकरी सध्या शंभू सीमेवर ठाण मांडून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संतप्त शेतकरी उद्या दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत. रस्त्यावरील पोलिसांचे बॅरिकेड्स हटवण्यासाठी जेसीबी आणि पोकलेन मशीन घेऊन शेतकरी दाखल झाले आहेत. पोलिसांच्या अश्रूधुराच्या नळकांड्या आणि रबर बुलेटपासून मशीन ऑपरेटर्सचे संरक्षण करण्यासाठी या मशीन्समध्येही बदल करण्यात आले आहेत. संपूर्ण केबिन लोखंडी जाड पत्र्यांनी फुलप्रूफ करण्यात आली आहे.
#WATCH | Protesting farmers bring heavy machinery including hydraulic cranes and earth movers to Shambhu on the Punjab-Haryana border pic.twitter.com/brTIhOSgXE
— ANI (@ANI) February 20, 2024
7-8 मशीन शंभू सीमेवर पोहोचल्या
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी अशी सुमारे 7 ते 8 मशिन तयार केली आहेत, जी पंजाब आणि हरियाणा, शंभू, खन्नौरी आणि डबवली सीमेवर तैनात करण्यात आली आहेत. बॅरिकेड्स तोडून ट्रॉलीसाठी मार्ग तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल.
चौथ्या बैठकीत तोडगा नाही
रविवारी झालेल्या चौथ्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी डाळी, मका आणि कापूस खरेदीसाठी किमान आधारभूत किंमत प्रस्तावित केली होती. सरकारचा हा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी सोमवारी तो प्रस्ताव फेटाळला. यानंतर शेतकऱ्यांनी बुधवारी दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली. किसान मजदूर मोर्चाचे नेते सर्वनसिंग पंढेर म्हणाले की, आम्ही सरकारला आवाहन करतो की एकतर आमचे प्रश्न सोडवावे किंवा बॅरिकेड्स हटवावे आणि आम्हाला शांततापूर्ण आंदोलनासाठी दिल्लीला जाण्याची परवानगी द्यावी.