मोदी सरकारविरोधात शेतकरी-मजूर रस्त्यावर; विविध मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 11:42 AM2018-09-05T11:42:32+5:302018-09-05T11:44:57+5:30
देशभरातील शेतकरी आणि मजूरांचा आंदोलनात सहभाग
नवी दिल्ली: महागाई, किमान भत्ता, कर्जमाफी यांच्यासह विविध मागण्यांसाठी देशातील शेतकरी आणि मजूर रस्त्यावर उतरले आहेत. रामलीला मैदानापासून सुरू झालेला शेतकऱ्यांचा मोर्चा संसद मार्गांपर्यंत पोहोचला आहे. या आंदोलनात देशभरातील शेतकरी आणि मजूरांचा सहभाग आहे. महापूराचा फटका बसलेल्या केरळचे शेतकरीदेखील यामध्ये सहभागी झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेदिल्लीतील अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली आहे. त्यामुळे काही रस्त्यांवरुन प्रवास न करण्याच्या सूचना दिल्लीतील वाहतूक पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. निवडणुका येतील आणि जातील. मात्र सरकारचं शेतीबद्दलचं धोरण चुकीचं आहे, अशा भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. सरकारनं शेतकरी आणि मजूरांबद्दलची धोरणं बदलायला हवीत, अशी मागणीदेखील आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
ऑल इंडिया किसान महासभेकडून या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं जात आहे. डाव्या संघटनांचा या आंदोलनात सहभाग आहे. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावर सध्या लाखो शेतकरी आणि मजूर पाहायला मिळत आहे. मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप डाव्या संघटनांनी केला आहे. जास्तीतजास्त शेतकरी आणि मजूरांनी आंदोलनात सहभागी व्हावं, असं आव्हान संघटनांकडून करण्यात आलं आहे. सर्व मजूरांना प्रति महिना किमान 18 हजार रुपये भत्ता, तरुणांना रोजगार, खाद्य वितरण व्यवस्थेत सुधारणा, मजूर कायद्यात बदल, स्वामीनाथन आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा आंदोलकांच्या मागण्या आहेत.