शेतकरी आंदोलनावरून नितीश कुमारांचे मोठे विधान, मोदी सरकारला केले असे आवाहन
By बाळकृष्ण परब | Published: November 30, 2020 08:29 PM2020-11-30T20:29:32+5:302020-11-30T20:38:34+5:30
Farmer Protest News : शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांसोबत भाजपाचे मित्रपक्षही सरकारला धारेवर धरू लागले आहेत.
पाटणा - दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांसोबत भाजपाचे मित्रपक्षही सरकारला धारेवर धरू लागले आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव सांगावा, त्यानंतरच शेतकऱ्यांचे समाधान होईल, असे विधान नितीश कुमार यांनी केले आहे.
नितीश कुमार म्हणाले की, केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली तर धान्याच्या खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नसल्याची खात्री शेतकऱ्यांना मिळेल. तसेच धान्याची खरेदी होईल आणि केंद्राकडून जे मूल्य निर्धारीत केले असेल ते त्यांना मिळेल, असेही नितीश कुमार म्हणाले.
पाटणा येथील खगौल येथे दीघा-एम्स एलिव्हेटेट मार्गाचे लोकार्पण करताना पत्रकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत विचारले असता नितीश कुमार म्हणाले की, सध्या जी बोलणी चालू आहे. तसेच जे सांगितले जात आहे त्यानुसार केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकार धान्याच्या खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचे सांगणार आहे. बिहारमध्ये आम्ही २००६ मध्येच जुनी व्यवस्था संपुष्टात आणली आहे. २००६ नंतर आम्ही धान्याची खरेदी पॅक्सच्या माध्यमातून करत आहोत. आधी इथे धान्याची खरेदी होत नसे. मात्र आम्ही ती करत आहोत.
वाजपेयी सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून काम केलेले नितीश कुमार म्हणाले की, देशभरात याबाबत जे काही केले जात आहे ते लोकांमध्ये जाऊन सांगण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसोबत चर्चा व्हावी, असे केंद्र सरकारचे मत आहे. चर्चा झाली तर शेतकऱ्यांना कुठल्याही पिकाच्या खरेदीमध्ये अडथळा येणार नसल्याची खात्री मिळेल. खरेदी होईल आणि जे मूल्य केंद्र सरकारकडून निर्धारित केले जाईल, ते त्यांना मिळेल.