Farmer Protest: कोणत्याही धमक्या, द्वेषभावना...; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच ग्रेटा थनबर्ग आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 07:11 PM2021-02-04T19:11:27+5:302021-02-04T19:16:30+5:30
Farmer Protest: ग्रेटाविरोधात दिल्लीत एफआयआर दाखल
नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी ग्रेटाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणावर ग्रेटानं ट्विट करत भाष्य केलं. ग्रेटानं तिच्या ट्विटमधून आक्रमक भूमिका घेतली आहे.
तेव्हा आपणही निषेध केला होताच ना?; 'त्या' विधानावरून उर्मिला मातोंडकरांचा थेट मोदींवर बाण?
'मी शेतकऱ्यांसोबत उभी आहे. शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कोणत्याही प्रकारच्या द्वेषभावना, धमक्या, मानवाधिकारांचं उल्लंघन ही गोष्ट बदलू शकत नाही,' असं ग्रेटानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर ग्रेटानं हे ट्विट केलं आहे. ग्रेटाविरोधात पोलिसांनी कलम १५३ ए, १२० बीच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चिथावणीखोर ट्विट केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
I still #StandWithFarmers and support their peaceful protest.
— Greta Thunberg (@GretaThunberg) February 4, 2021
No amount of hate, threats or violations of human rights will ever change that. #FarmersProtest
ग्रेटा कशामुळे अडचणीत?
पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गनं शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणारं ट्विट केलं. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे आम्ही एकजुटीनं उभे आहोत, असं ग्रेटानं ट्विटमध्ये म्हटलं होतं. ग्रेटानं दुसऱ्या एका ट्विटमध्ये एक डॉक्युमेंट शेअर केलं होतं. त्यामध्ये भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठीची रणनीती नमूद करण्यात आली होती. भारतावर पाच टप्प्यांमध्ये दबाव करण्याचा उल्लेख यामध्ये होता. ग्रेटानं हे ट्विट थोड्या वेळात डिलीट केलं.
'Tweet Together'... सायना नेहवालनं अक्षय कुमारचं ट्विट जसंच्या तसं कॉपी केलं
जुनं ट्विट डिलीट केल्यानंतर ग्रेटानं एक अपडेटेड टूलकिट शेअर केलं. या नव्या टूलकिटमध्ये अनेक बदल केले होते. २६ जानेवारीला भारतासह परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची योजना यामधून हटवण्यात आली होती. 'जर तुमची मदत करण्याची इच्छा असेल तर हे अपडेटेड टूलकिट आहे. मागील डॉक्युमेंट मी हटवलं आहे. कारण ते जुनं होतं,' असं ग्रेटानं नव्या टूलकिटसोबतच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.