ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण; आता 'संसद मार्च'बद्दल शेतकरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 02:07 PM2021-01-27T14:07:14+5:302021-01-27T14:08:39+5:30
शेतकरी संघटनांनी १ फेब्रुवारी रोजी संसद भवनाला घेराव घालणार असल्याची घोषणा याआधीच केली होती.
दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी नेत्यांवर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यासोबतच दिल्ली पोलिसांकडूनही आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनी १ फेब्रुवारी रोजी संसद भवनाला घेराव घालणार असल्याची घोषणा केली होती. पण सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांकडून 'संसद मार्च' रद्द केला जाण्याची शक्यता आहे.
१ फेब्रुवारी रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. याच दिवशी संसदेपर्यंत मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त करणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनांनी केली होती. पण प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर संसद मार्च रद्द करण्याबाबतचा मोठा निर्णय शेतकरी संघटना घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अमित शहा इन ऍक्शन! गृह मंत्रालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; पुढील काही तास महत्त्वाचे
दिल्लीत काल झालेल्या हिंसाचारात सरकारी मालमत्तेचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. तर ३०० दिल्ली पोलीस जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेबाबत शेतकरी आंदोलकांच्या प्रतिनिधींची बैठक आता दिल्लीच्या सीमेवर सुरू आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.
प्रजासत्ताक दिनी दिल्ली पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गाचं उल्लंघन करत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर लाल किल्ल्यापर्यंत पोहोचल्याने शेतकरी संघटनांचे नेते आता 'संसद मार्च'साठी संभ्रमात सापडले आहेत. त्यात कालच्या घटनेवर केंद्र सरकारही मोठी कारवाई करण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे येत्या काही तासांत शेतकरी आंदोलनाबाबत मोठ्या घडामोडी राजधानी दिल्लीत घडताना दिसतील.
खळबळजनक! "काठ्या घेऊन रॅलीत या"; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा व्हिडिओ व्हायरल
दिल्लीतील हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन डझनपेक्षाही अधिक एफआयआर दाखल केले आहेत. तर दोनशेहून अधिक जणांना अटक केली आहे. प्रजासत्ताक दिनी हिंसाचार भडकलेल्या भागांत पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी गृह मंत्रालयाला दिलेल्या माहितीनंतर हे पाऊल उचलण्यात आलं. काल हिंसाचार उफाळलेल्या भागातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे.