शेतकरी मोर्चात तणाव; ७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; ‘दिल्ली चलो’ मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 06:45 AM2024-02-25T06:45:33+5:302024-02-25T06:45:42+5:30

आंदोलक २९ फेब्रुवारीपर्यंत शंभू व खनौरी सीमेवर थांबतील, असे शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांनी दिली. 

Farmer Protest: Tension in farmers' march; Internet shutdown in 7 districts; The 'Delhi Chalo' march has been postponed till February 29 | शेतकरी मोर्चात तणाव; ७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; ‘दिल्ली चलो’ मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित

शेतकरी मोर्चात तणाव; ७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; ‘दिल्ली चलो’ मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित

चंडीगड : किमान हमीभावाचा कायदा करण्यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनातील संघर्षामुळे तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हरयाणाच्या अंबाला, कुरूक्षेत्र, कैथल, जींद, हिसार, फतेहाबाद, सिरसा या ७ जिल्ह्यांत लावण्यात आलेली मोबाइल इंटरनेट व सामूहिक एसएमएस (संदेश) सेवेवरील बंदी शनिवारी रात्री ११:५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली.

संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चा या संघटनांच्या नेतृत्वातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणा सरकारकडून सर्वप्रथम ११ फेब्रुवारी रोजी इंटरनेट व सामूहिक एसएमएसवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर १३, १५, १७, १९, २० आणि २१ फेब्रुवारी रोजी बंदीला मुदतवाढ देण्यात आली होती. शनिवारी आंदोलनाचा १२ दिवस होता. परिस्थिती अजूनही गंभीर आणि तणावपूर्ण असल्यामुळे इंटरनेट व सामूहिक एसएमएसवरील बंदी वाढविण्यात येत आहे. व्हॉईस कॉल सेवा मात्र सुरू राहील, असे अतिरिक्त मुख्य सचिव टी .व्ही. एस .एन.प्रसाद यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

चकमकीनंतर मोर्चाला ५ दिवसांचा ब्रेक
खनौरी येथे पोलिस आणि आंदोलकांत चकमक झाल्यानंतर बुधवारी शेतकऱ्यांची दिल्ली कूच २ दिवसांसाठी स्थगित केली होती. आंदोलक २९ फेब्रुवारीपर्यंत शंभू व खनौरी सीमेवर थांबतील, असे शेतकरी नेते सरवणसिंग पंधेर यांनी दिली. 

तोपर्यंत अंत्यसंस्कार नाहीत...
खनौरी येथे ठार झालेला शेतकरी शुभकरण सिंह याच्या मृत्यूप्रकरणी पंजाब पोलिसांनी गुन्हा नोंदवावा; अन्यथा तोपर्यंत शुभकरणच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा शेतकरी नेते  जगजीत सिंह डल्लेवाल यांनी दिला. 

जखमी शेतकऱ्यांना आमच्याकडे सोपवा; पंजाब पोलिसांची मागणी
दरम्यान, पंजाबचे मुख्य सचिव अनुराग वर्मा यांनी शनिवारी हरयाणाच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहून जखमी शेतकऱ्यांना मोफत उपचारासाठी पंजाब सरकारच्या स्वाधीन करण्याची मागणी केली.
रोहतकमध्ये उपचार घेत असलेले प्रीतपालसिंह आणि इतर शेतकऱ्यांना आपल्याकडे सोपविण्याची मागणी वर्मा यांनी केली आहे.

Web Title: Farmer Protest: Tension in farmers' march; Internet shutdown in 7 districts; The 'Delhi Chalo' march has been postponed till February 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.