शेतकरी आंदोलनाला लवकरच पूर्णविराम मिळेल- नरेंद्र सिंह तोमर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 05:27 AM2021-02-12T05:27:41+5:302021-02-12T07:13:34+5:30

शेतकऱ्यांकडून येणाऱ्या प्रस्तावाची आम्ही वाट पाहत आहोत

farmer protest will end soon says narendra singh tomar | शेतकरी आंदोलनाला लवकरच पूर्णविराम मिळेल- नरेंद्र सिंह तोमर

शेतकरी आंदोलनाला लवकरच पूर्णविराम मिळेल- नरेंद्र सिंह तोमर

Next

- विकास झाडे

नवी दिल्ली : आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा आम्ही सन्मान करतो. परंतु तोडगा काढायचा असेल, तर तो सीमेवर निघणार नाही, टेबलवरच निघू शकतो. आम्ही शेतकऱ्यांकडून येणाऱ्या प्रस्तावाची वाट पाहत आहोत, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.

भाजपचे थिंक टॅंक खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या निवासस्थानी मोजक्या पत्रकारांसमोर नरेंद्र सिंग तोमर यांनी कृषी कायदे आणि आंदोलनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. तोमर म्हणाले, मोदी सरकारची भूमिका सतत शेतकऱ्यांच्या कल्याणाची आणि न्याय देण्याची आहे. शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत आम्ही ११ बैठका घेतल्या. तासन‌्तास चाललेल्या या बैठकांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचीच चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता, शेवटच्या बैठकीमध्ये आम्ही तिन्ही कृषी कायदे दीड वर्षे स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही. आता आम्ही शेतकऱ्यांकडून नव्या प्रस्तावाची वाट पाहात आहोत. मनात कोणताही संभ्रम न ठेवता त्यांच्याकडून मनमोकळी चर्चा अपेक्षित आहे. 

कायद्याचे अध्ययन व्हावे
शेतकऱ्यांनी कायद्यातील कोणतेही आक्षेप ठोसपणे मांडले नाहीत. त्यांनी आधी कायद्याचे अध्ययन करावे त्यानंतर त्यांनाच हा कायदा शेतकऱ्यांच्या किती हिताचा आहे, ते पटेल. कायदा पारित झाला, तेव्हा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कायद्याचे स्वागत केले होते, याकडेही तोमर यांनी लक्ष वेधले.

‘एमएसपी‘ कायदा कसा शक्य आहे?
तोमर म्हणाले, एमएसपीचा कायदा कसा शक्य आहे? याचा भुर्दंड सामान्यांवर बसेल. परंतु एमएसपी आधीप्रमाणेच सुरू आहे. त्याला जराही छेडले जाणार नाही. शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविण्यात आला आहे. 

काँग्रेसकडून दिशाभूल
केवळ राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. परंतु ही बाब फार काळ टिकणार नाही. शेतकऱ्यांनाही सत्य काय आहे ते उलगडेल, असेही ते म्हणाले. 

Web Title: farmer protest will end soon says narendra singh tomar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.