कोबीला केवळ १ रु. किलोचा भाव; शेतकऱ्यानं उभ्या पिकावर चालवला ट्रॅक्टर!
By मोरेश्वर येरम | Published: December 14, 2020 04:00 PM2020-12-14T16:00:36+5:302020-12-14T16:01:46+5:30
समस्तीपूर जिल्ह्यातील मुक्तापूर येथील ओम प्रकाश यादव या शेतकऱ्यानं लाखो रुपये खर्च करुन कोबीचं पीक घेतलं होतं.
समस्तीपूर
देशात सध्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं गेल्या १८ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे बिहारच्या समस्तीपूरमध्ये कोबीच्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्यानं तर रागाच्या भरात उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून निषेध व्यक्त केला आहे.
समस्तीपूर जिल्ह्यातील मुक्तापूर येथील ओम प्रकाश यादव या शेतकऱ्यानं लाखो रुपये खर्च करुन कोबीचं पीक घेतलं. पण बाजारात त्याच्या कोबीला १ रुपया प्रतिकिलो देखील भाव मिळत नाहीय. "कापणीसाठी एकतर मजुरांना बोलवावं लागतं. मग कोबी गोण्यांमध्ये भरुन बाराजात न्यावा लागतो. पण तिथं गेल्यावर प्रतिकिलो १ रुपयानं देखील कुणी कोबी खरेदी करायला तयार नाही. त्यामुळे नाईलाजनं उभ्या शेतीवर मला ट्रॅक्टर चालवण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही", असं ओम प्रकाश यादवने सांगितलं.
उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालवण्याची ही दुसरी वेळ असल्याचं ओम प्रकाश यांनी सांगितलं. सरकारकडून एक रुपयाचीही मदत मिळत नसल्याचंही ते म्हणाले. याआधी ओम प्रकाश यांचं गहूचं पीक खराब झालं होतं. त्यावेळी सरकारनं नुकसान भरपाई म्हणून केवळ एक हजार ९० रुपये दिल्याचं ओम प्रकाश म्हणाले.