म्हणून राजस्थानमध्ये 30 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे गोमुत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 02:04 PM2018-07-24T14:04:58+5:302018-07-24T14:05:14+5:30
पशुपालन करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दुग्ध उत्पादनाबरोबरच गोमुत्र सुद्धा कमाईचे उत्तम माध्यम बनले आहे.
जयपूर - राजस्थानमध्ये पशुपालन करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दुग्ध उत्पादनाबरोबरच गोमुत्र सुद्धा कमाईचे उत्तम माध्यम बनले आहे. राज्यात गो संरक्षणाचे काम करत असलेले सर्व शेतकरी दुधाबरोबरच गोमुत्रसुद्धा बाजारात विकू लागले आहेत. ज्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
राजस्थानमध्ये गिर आणि थरपरकार या जातीच्या गाईंच्या गोमुत्राला खूप मागणी आहे. त्यामुळे पशुपालकांना या गोमुत्राची चांगली किंमत मिळत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना गाईच्या दुधाचे 15 ते 20 रुपयेच मिळत आहेत तर गोमुत्रासाठी 22 ते 25 रुपये दर मिळत आहे.
गोमुत्राचा वापर जैविक शेतीसाठी होतो. त्यामुळे या क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तींकडून गोमुत्राची खरेदी होते. गोमुत्राच्या विक्रीतून माझ्या कमाईत 30 टक्क्यांनी भर पडली आहे, असे जयपूर येथील पशुपालक कैलास गुर्जर यांनी सांगितले.
राजस्थान सरकारच्या अधिनस्थ असलेल्या महाराणा प्रताप कृषि आणि प्रौद्योगिकी विद्यापीठाकडूनसुद्धा दरवर्षी सुमारे 3500 लीटर ते 6000 लीटर गोमुत्राची खरेदी केली जाते. या गोमुत्राचा वापर विद्यापीठातील जैविक कृषीवर संशोधन तसेच अन्य कामांसाठी केला जातो. गोमुत्राच्या खरेदीसाठी विद्यापीठाने राज्यातील अनेक गोशाळांसोबत करार केलेला आहे.