काही अदृश्य शक्तींना शेतकरी आंदोलनात तोडगा निघू नये असं वाटतंय; कृषी मंत्र्यांचा निशाणा कोणावर?

By कुणाल गवाणकर | Published: January 24, 2021 04:21 PM2021-01-24T16:21:23+5:302021-01-24T16:23:24+5:30

सरकारनं शेतकऱ्यांना अनेक प्रस्ताव दिले; पण शेतकऱ्यांनी एकही प्रस्ताव दिला नाही- नरेंद्र तोमर

Farmer unions only talk about killing farm laws says union minister Narendra Tomar | काही अदृश्य शक्तींना शेतकरी आंदोलनात तोडगा निघू नये असं वाटतंय; कृषी मंत्र्यांचा निशाणा कोणावर?

काही अदृश्य शक्तींना शेतकरी आंदोलनात तोडगा निघू नये असं वाटतंय; कृषी मंत्र्यांचा निशाणा कोणावर?

Next

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांनी आता ट्रॅक्टर मोर्चाची तयारी सुरू केली आहे. २६ जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये ११ वेळा बैठक झाली आहे. मात्र यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. यानंतर आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी आंदोलनामागे अदृश्य शक्ती असल्याचं म्हटलं आहे. हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'शी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

शेतकरी संघटना केवळ कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करतात. ते कायद्यांच्या फायद्यांबद्दल बोलतच नाहीत, असं म्हणत तोमर यांनी दु:ख व्यक्त केलं. शेतकरी आणि सरकारमधील तणाव संपू नये असं काही अदृश्य शक्तींना वाटतं, असा दावा त्यांनी केला. या अदृश्य शक्ती कोण आहेत, याबद्दल विचारलं असता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी त्यावर भाष्य करणं टाळलं. शेतकऱ्यांना कृषी कायद्यांचे फायदे जाणूनच घेण्याची इच्छाच नाही. त्यामुळे आतापर्यंतच्या बैठका निष्फळ ठरल्या, असं तोमर यांनी म्हटलं.

शेतकऱ्यांचं आंदोलन आम्ही संवेदनशीलपणे हाताळण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचं तोमर यांनी सांगितलं. 'शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये रेल्वे रुळांवर आंदोलन सुरू केल्यापासूनच आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये याची आम्ही पूर्ण काळजी घेतली. या विषयात तोडगा निघावे यासाठी आमच्याकडून अनेकदा प्रयत्न केले गेले,' असं तोमर म्हणाले.

आम्ही आंदोलक शेतकऱ्यांना बैठकांच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव दिले. शुक्रवारी आमची शेतकऱ्यांसोबत बैठक झाली. त्याआधीच आम्ही त्यांना सरकार दोन वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती देण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. याबद्दलचा प्रस्ताव सरकारकडून देण्यात आला. मात्र तो त्यांनी अमान्य केला. तुम्ही सरकारला प्रस्ताव द्या, असं आवाहन सरकारकडून शेतकऱ्यांना करण्यात आलं. मात्र शेतकऱ्यांनी कोणताही प्रस्ताव दिला नाही, याकडे तोमर यांनी लक्ष वेधलं.
 

Web Title: Farmer unions only talk about killing farm laws says union minister Narendra Tomar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी