शेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात केंद्रानं पाठवले 1100 निमलष्करी दलाचे जवान

By Admin | Published: June 8, 2017 09:07 AM2017-06-08T09:07:29+5:302017-06-08T09:07:29+5:30

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यात उफाळून आलेला हिंसाचार रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत

Farmer's agitation: 1100 paramilitary personnel sent to central Madhya Pradesh | शेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात केंद्रानं पाठवले 1100 निमलष्करी दलाचे जवान

शेतकरी आंदोलन : मध्य प्रदेशात केंद्रानं पाठवले 1100 निमलष्करी दलाचे जवान

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यात उफाळून आलेला हिंसाचार रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत, मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत चाललं आहे.  मंगळवारी (6 जून) पोलिसांच्या गोळीबारात 5 आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलन हिंसक झाले आहे. शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटद्वारे शेतक-यांना शांतता राखण्याचं आवाहन केले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मध्य प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली होती. 
 
केंद्र सरकारने मध्य प्रदेशातील मंदसौरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निमलष्करी दलाचे जवळपास 1100 जवान पाठवण्यात आले आहेत.  तसंच केंद्र सरकारनं बुधवारी राज्य सरकारकडून मध्य प्रदेशातील परिस्थितीबाबत अहवालही मागवला आहे. दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी (7 जून) पोलिसांच्या गोळीबारात मृत पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मंदसौर येथे रवाना झाले आहेत. 
 
मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनातील हिंसाचाराबाबत बोलताना राहुल म्हणाले की, हे सरकार आमच्या देशातील शेतकऱ्यांशी युद्ध करीत आहे. भाजपाच्या नव्या भारतात आपल्या हक्काची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या बदल्यात गोळ्या मिळत आहेत, असे ट्विट राहुल यांनी केलं होतं. 
 
बुधवारी येथील परिस्थिती अधिक गंभीर झाली कारण शेतक-यांच्या आंदोलनाचे लोण राज्यातील अन्य भागांमध्येही पसरले. 
बुधवारी शेतक-यांनी देवासमधील पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला आणि तेथील वाहनं पेटवून दिली. तर भोपाळ-इंदुरदरम्यान दोन बससहीत जवळपास 10 हून अधिक वाहनांनादेखील शेतक-यांनी आग लावली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतक-यांनी पिपलिया पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला, जेथे त्यांनी उग्र स्वरुपात आपला संताप व्यक्त करीत तेथील वाहनांना आगल लावली. यानंतर आंदोलनकर्ते शेतकरी नेवली फाटाकडे वळले, व तेथेही मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली.
 
दरम्यान, केंद्रीय मंत्री व्यकंय्या नायडू यांनी शेतक-यांच्या या आंदोलनाला काँग्रेस पार्टीला जबाबदार धरले. मध्य प्रदेशातील मंदसौरमधील शेतक-यांच्या आंदोलनाच्या नावावर काँग्रेस पार्टी हिंसाचार घडवत असल्याचा आरोप नायडू यांनी बुधवारी केला.
काँग्रेस या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. मला फक्त त्यांना हेच सांगायचे आहे की त्यांनी यांचं राजकारण करू नये आणि शेतकरी आंदोलनाच्या नावावर हिंसा भडकवू नये, कारण याचे परिणाम त्यांच्यावर उलटू शकतात, असाही इशारा नायडू यांनी दिला.
 
दरम्यान, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदक करण्याची घोषणा केली. ट्विटर आर्थिक मदतीची घोषणा करताना अखिलेश यांनी भाजपावर निशाणादेखील साधला. ""उत्तर प्रदेशात कर्जमाफीच्या नावाखाली विश्वासघात, महाराष्ट्रातील शेतकरी संपावर. मध्य प्रदेश (मंदसौर)मध्ये गोळीबार करुन 5 शेतक-यांची हत्या"", असे ट्विट करत अखिलेश यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 
 
दरम्यान, गृहमंत्री भूपेंद्रसिंह यांनी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे.
 

Web Title: Farmer's agitation: 1100 paramilitary personnel sent to central Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.