Farmer's Agitation: चर्चा निष्फळ, कायदे मागे घेण्यावर सर्व संघटना ठाम; शेतकरी रॅली काढणारच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 12:30 AM2021-01-23T00:30:58+5:302021-01-23T06:46:08+5:30
नाराज झालेल्या मंत्रीगटाने पुढच्या बैठकीची तारीखही शेतकऱ्यांना दिली नाही. तिकडे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅलीही काढणार आहेत.
विकास झाडे -
नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे सर्वोत्तम आहेत. तरीही आम्ही ते काही काळ स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. आता यापेक्षा आम्ही अधिक काहीही करू शकत नाही, असे सांगत मंत्रीगटाने शेतकरी नेत्यांसोबतची बैठक आवरती घेतली. नाराज झालेल्या मंत्रीगटाने पुढच्या बैठकीची तारीखही शेतकऱ्यांना दिली नाही. तिकडे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅलीही काढणार आहेत.
आंदाेलकांची जोरदार तयारी -
आंदोलनाला ५८ दिवस पूर्ण झाले आहेत. सरकारचा निषेध म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या रिंंगरोडवर ट्रॅक्टर रॅली काढण्याचे शेतकऱ्यांनी निश्चित केले आहे. शेतकऱ्यांची यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रॅलीला जाता यावे यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे. ठिकठिकाणी रॅलीची रंगीत तालीमही सुरु आहे.
प्रसारमाध्यमांकडे गेल्याने शेतकरी नेत्यांना सुनावले -
शुक्रवारी विज्ञान भवनात शेतकरी नेते आणि मंत्रीगटासोबत अकरावी बैठक होती. दहाव्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना दिलेला कायदे स्थगितीचा प्रस्ताव फेटाळल्याने अस्वस्थ झालेले कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले, सरकार कायदे रद्द करणार नाही.
कायद्या सुधारणा हव्या तर सुचवा, ते दीड ते दोन वर्षांसाठी स्थगित करायचे असेल तर बोला. तुम्ही आतापर्यंत सहकार्य केल्याबाबत आभारी आहोत. आम्ही सन्मान म्हणून स्थगितीचा प्रस्ताव दिला परंतु तुम्ही त्यावर निर्णय घेऊ शकले नाहीत. या प्रस्तावाबाबत तुम्ही मीडियाकडे न जाता आमच्याशी बोलू शकले असते, असेही तोमर यानी नेत्यांना सुनावले.
पुढच्या बैठकीची तारीख ठरली नाही -
केंद्रानेही आता कठोर भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांकडून जोपर्यंत सरकारकडे कोणताही प्रस्ताव जात नाही तोपर्यंत पुढची बैठक होणार नाही. तोमर यांनी तूर्तास कोणतीही बैठक नसल्याचे बैठकीनंतर सांगितले. आजच्या मंत्रीगटामध्ये वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राज्यमंत्री सोमप्रकाश यांचा समावेश होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ २० मिनिटे आजची अधिकृत बैठक चालली.