मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलनाची धग कायम
By Admin | Published: June 8, 2017 12:17 AM2017-06-08T00:17:47+5:302017-06-08T00:17:47+5:30
मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात संचारबंदी लागू असूनही शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन बुधवारीही सुरूच राहिले.
भोपाळ/इंदोर : मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात संचारबंदी लागू असूनही शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन बुधवारीही सुरूच राहिले. संतापाने धुमसत असलेल्या आंदोलकांनी बँका आणि कारखान्यांसह अनेक वाहने पेटवून दिली. शेतकऱ्यांची समजूत काढण्यास गेलेले जिल्हाधिकारी स्वतंत्रकुमार सिंह यांनाही आंदोलकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. नीमच जिल्ह्यात पोलीस ठाण्यात उभी असलेली वाहने पेटवून देण्यात आली. शेतकऱ्यांनी सरकारवरील राग रेल्वे रुळावर काढत मंदसौरजवळ रेल्वे रूळ उखडून टाकले. राज्यातील हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा आजही बंद होती.
मंदसौर शहर आणि पिपलिया मंडीतील संचारबंदी बुधवारी कायम होती. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे कुटुंबीय आणि शेतकऱ्यांनी बरखेडा पंत येथे रास्ता रोको आंदोलन केले. दुसरीकडे राष्ट्रीय किसान मजदूर संघ आणि काँग्रेसनेही बुधवारी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. संचारबंदी लागू असूनही शेतकऱ्यांनी पिपलिया मंडी येथील कारखाना पेटवून दिला, तसेच बही चौपाटी परिसरात तीन मोठ्या वाहनांना आगीच्या हवाली केले. जिल्ह्याच्या कयामपूर येथे शेतकऱ्यांनी युको, जिल्हा सहकारी बँक आणि कृषक सेवा सहकारी समितीच्या शाखांना आगीच्या हवाली केले. शेतमालाला रास्त भाव मिळावा, यांसह विविध मागण्यांसाठी मध्यप्रदेशातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मंदसौर जिल्ह्यात आंदोलकांनी ग्रामपंचायत कार्यालयही पेटवून दिले. बरखेडा पंत गावातून जाणारा मार्गही रोखला. गोळीबारात मृृत्युमुखी पडलेला विद्यार्थी अभिषेक पाटीदार याचा मृतदेह रस्त्यावर ठेवून शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
>८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा
मंगळवारी झालेल्या गोळीबारात ५ नव्हे, तर ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, असा दावा राष्ट्रीय किसान मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार शर्मा यांनी इंदोरमध्ये एका पत्रकार परिषदेत केला आहे. या वेळी किसान युनियन, भारतीय किसान युनियनसह अन्य संघटनांच्या नेत्यांनीही हाच दावा केला. शेतकऱ्यांवरील कारवाई रोखण्यात आली नाही तर शेतकरी जेलभरो आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंंह चौहान यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
इंदोरहून भोपाळला येणाऱ्या बससह या मार्गावरील दहापेक्षा अधिक वाहने आंदोलकांनी पेटवून दिली. तर देवासमध्ये हाट पिपल्लया ठाण्यावर धडक देऊन शेतकऱ्यांनी येथील वाहने जाळली. यानंतर आंदोलक नेवली फाट्याकडे गेले. तेथेही अनेक वाहनांची तोडफोड केली. याशिवाय या भागातून जाणारे दहापेक्षा अधिक वाहने जाळली आणि दगडफेक केली. मंदसौरच्या पिपल्यामंडी येथेही आंदोलकांनी अनेक वाहनांना आगीच्या हवाली केले.