पेन्शन योजनेसाठी शेतकऱ्यांनाही द्यावे लागेल अंशदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 04:37 AM2019-07-14T04:37:18+5:302019-07-14T04:37:22+5:30
जे शेतकरी पेन्शन योजनेसाठी बँकेत अर्ज करतील, त्यांनाच केंद्र सरकार वृद्धावस्था पेन्शन योजनेचा लाभ देणार आहे.
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : जे शेतकरी पेन्शन योजनेसाठी बँकेत अर्ज करतील, त्यांनाच केंद्र सरकार वृद्धावस्था पेन्शन योजनेचा लाभ देणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या योजनेबाबत सांगितले की, ही योजना ऐच्छिक असून शेतकऱ्यांनाही त्यासाठी अंशदान द्यावे लागणार आहे.
मोदी सरकारच्या दुसºया कार्यकाळात पेन्शन योजनेबाबत असे मानले जात आहे की, ज्या शेतकºयांचे वय ६० वर्षे आहे त्यांच्या खात्यात सरकार महिन्याला तीन हजार रुपये टाकणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकºयांना अर्ज करावा लागेल.
यासाठी बँकेत खाते सुरू करावे लागेल. तसेच, त्या खात्यात ठराविक रक्कम जमा करावी लागेल. केंद्र सरकारही शेतकºयांच्या रकमेएवढी रक्कम पेन्शन योजनेत जमा करेल. ज्या शेतकºयांचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
>काय आहे नेमकी योजना?
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, ही योजना छोट्या शेतकºयांना सुरक्षा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. कारण, वृद्धावस्थेत या शेतकºयांकडे कोणतीही बचत असत नाही. त्यामुळे आर्थिक संकटाला त्यांना सामोरे जावे लागते. योजनेनुसार शेतकºयाचे वय ६० वर्षे झाल्यानंतर दर महिन्याला किमान तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. ही ऐच्छिक आणि अंशदान आधारित आहे. यात नोंदणीकृत शेतकरी आणि केंद्र सरकारचा हिस्सा समान असेल.