आंदाेलनातील शेतकरी भांगडा-डीजेवर धरणार ठेका, लढ्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 04:00 AM2020-12-06T04:00:22+5:302020-12-06T04:05:09+5:30
Farmer Protest : या काळात शेतकऱ्यांचे मनाेधैर्य खचू नये यासाठी आता काही तरुण शेतकऱ्यांनी वाहनांवर डीजे संगीत सिस्टम बसविली आहे. आंदाेलनाला पंजाबी संगीताची जाेड मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह कायम राहण्यास मदत होणार आहे.
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्याविराेधात गेल्या दहा दिवसांपासून शेतकऱ्यांचे तीव्र आंदाेलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी प्रदीर्घ आंदोलनाची तयारी चालविली आहे. या काळात शेतकऱ्यांचे मनाेधैर्य खचू नये यासाठी आता काही तरुण शेतकऱ्यांनी वाहनांवर डीजे संगीत सिस्टम बसविली आहे. आंदाेलनाला पंजाबी संगीताची जाेड मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह कायम राहण्यास मदत होणार आहे.
दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेला लढा किती दिवस सुरू राहील, याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी काही महिन्यांचा धान्य पुरवठा साेबत आणला आहे. लंगर भाेजनाच्या पंगती महामार्गावर बसलेल्या दिसत आहेत. आता मनाेरंजनाची जाेड आंदाेलनाला मिळाली आहे. सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याने रिकाम्या ट्रॅक्टरवर डीजे यंत्रणा बसविली. एखाद्या वरातीमध्ये शाेभून दिसेल अशा पद्धतीने त्याने ट्रॅक्टर सजविलेले आहे. डीजेवर पंजाबी गाण्यांसह हरयाणवी संगीत वाजविले जात असून, शेतकऱ्यांनी भांगडा नृत्य करून आनंद लुटला.
ब्रिटनच्या ३६ खासदारांचे शेतकरी आंदाेलनाला समर्थन
लंडन : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविराेधात शेतकऱ्यांनी माेठे आंदाेलन सुरू केले आहे. त्यास ब्रिटनच्या ३६ खासदारांनीही पाठिंबा दिला आहे. ब्रिटिश सरकारने नरेंद्र माेदी सरकारसाेबत शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासंदर्भात पत्रही लिहिले आहे. दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांनीही सहानुभूती व्यक्त करतानाच लाेकांना शांततापूर्ण मार्गाने आंदाेलनाचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटनमध्ये शीख समुदाय माेठ्या प्रमाणात आहे. या समुदायातील खासदारांनी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डाॅमिनिक राब यांना पत्र लिहून माेदी सरकारसाेबत चर्चा करण्याची विनंती केली आहे.
पाठिंब्याचा पुनरुच्चार
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडाे यांनी कॅनडा शेतकऱ्यांना पाठिंब्याचा पुनरुच्चार केला आहे. भारताने तीव्र नाराजी व्यक्त करून द्विपक्षीय संबंध बिघडतील, असा इशारा दिला हाेता. तरीही ट्रुडाे वक्तव्यावर ठाम आहेत. सरकारने चर्चा सुरू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.