शेतकरी आक्रमक, सीमेवरच धरणे, रस्ते जाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 03:45 AM2020-11-28T03:45:44+5:302020-11-28T03:46:03+5:30
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी हजारो शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. पंजाब, राजस्थान आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांचे लोंढेच्या लोंढे दिल्लीच्या सीमेवर आहेत.
विकास झाडे
नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी बुराडी येथील मैदानावर धरणे द्यावेत, असे दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सुचविले. दरम्यान, काही ठिकाणी सुरक्षा दलांशी झालेल्या वादामुळे शेतकऱ्यांनी सीमेवरच धरणे दिल्याने संपूर्ण रस्ते जाम झाले होते.
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी हजारो शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. पंजाब, राजस्थान आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांचे लोंढेच्या लोंढे दिल्लीच्या सीमेवर आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमा बंदिस्त केल्या असल्याने शेतकरी पुन्हा आक्रमक झाले. शेतकरी दिल्लीत पोहचू नयेत म्हणून काही ठिकाणी रस्तेही खोदण्यात आले आहेत. कृषी कायद्याला पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेशसह अन्य राज्यांतूनही विरोध होत आहे. महाराष्ट्रातूनही कायद्याला विरोध करण्यासाठी चारशेवर शेतकरी दिल्लीत पोहचले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांना सीमेवर रोखणे योग्य नसल्याचे सांगितले.
सर्वत्र सुरक्षा यंत्रणा तैनात
या आंदोलनाला केव्हाही आक्रमक स्वरूप येऊ शकते याची जाणीव असल्याने दिल्ली पोलिसांनी कापसहेडा सिंघू, टिकरी, ढासा, फरिदाबाद, गुरुग्राम आदी ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात केली आहे. शुक्रवारी रात्री फरिदाबाद, गुरुग्राम आणि सोनीपत येथील रस्ते जाम झाले होते.