शेतकऱ्यांचा २६ मार्चला भारत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 05:54 AM2021-03-12T05:54:36+5:302021-03-12T05:55:09+5:30
व्यापारी संघटना आणि शेतकरी मिळून दि. १५ मार्चला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात निदर्शने करणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बुटा सिंग बुर्जगील यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला १२० दिवस होत असल्याच्या निमित्ताने येत्या २६ मार्च रोजी संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा भारत बंदचा निर्णय घेतला आहे. या दिवशी केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्याची होळी करून सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.
व्यापारी संघटना आणि शेतकरी मिळून दि. १५ मार्चला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात निदर्शने करणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बुटा सिंग बुर्जगील यांनी सांगितले. दि. १९ मार्चला बाजार समिती वाचवा, शेती वाचवा दिवस साजरा करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली. दि. २६ मार्चला भारत बंद आंदोलन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शांततेत पार पडणार आहे. दि. १ डिसेंबरपासून सरकार आणि शेतकऱ्यांदरम्यान चर्चा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या ४० संघटनांचे प्रतिनिधी आणि मंत्रीगटादरम्यान चर्चेच्या अकरा फेऱ्या झाल्या.