शेतीपर्यंत आलेच नाही सरदार सरोवराचे पाणी , शेतकरी नाराज; ग्रामीण भागाचा वेगळा मूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:56 AM2017-11-30T01:56:02+5:302017-11-30T01:56:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६७ व्या वाढदिवशी, सप्टेंबरात त्यांच्याच हस्ते सरदार सरोवराचे उद्घाटन झाले. तब्बल ५0 हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नर्मदेवरील या प्रकल्पामुळे तीन हजार गावांना आणि १ कोटी ८0 लाख ५४ हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळेल, असा दावा करण्यात आला होता.
सुरेंद्रनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६७ व्या वाढदिवशी, सप्टेंबरात त्यांच्याच हस्ते सरदार सरोवराचे उद्घाटन झाले. तब्बल ५0 हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नर्मदेवरील या प्रकल्पामुळे तीन हजार गावांना आणि १ कोटी ८0 लाख ५४ हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळेल, असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे गुजरातमधील शेतकरी अतिशय आनंदात होते. तीन हजार गावांतील बायकाही खुशीत होत्या. पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, असे त्यांना वाटू लागले होते.
धरण बांधून पूर्ण झाले असले तरी आम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण झालेलीच नाही, असे सौराष्ट्रातील भावनगर, सुरेंद्र नगर व बोटाड जिल्ह्यांतील लोक उघडपणे सांगत आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आम्हाला नर्मदेच्या पाण्याचे वचन दिले जात आहे आणि ते पूर्ण मात्र केले गेलेले नाही. त्यामुळे आम्ही यंदा नव्या पक्षाला सरकार स्थापन करू देण्याच्या विचारात आहोत, असे शेतकरी म्हणत आहेत. भाजपाला आव्हान आहे ते केवळ काँग्रेसचेच. त्यामुळे त्यांच्या मनात सध्या काँग्रेसच आहे. प्रत्यक्ष तसेच ते मतदान करतील? नव्या पक्षाचे सरकार गुजरातेत प्रत्यक्ष येईल?
काँग्रेसला मात्र तसे वाटत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला गुजरातच्या ग्रामीण भागांत ४९ जागा मिळाल्या, तर भाजपाला ४४ जागा. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही ग्रामीण भागात भाजपाला इथे नुकसानच झाले आणि काँग्रेसचा फायदा झाला. एके काळी भाजपाला भरघोस मते देणारा ग्रामीण भाग यंदा वेगळा विचार करत आहे, असा त्यामुळे काँग्रेसचा दावा आहे. त्यामुळे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. पण ग्रामीण भागांत पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची समस्या सरदार सरोवरानंतरही कायम राहणे, ही भाजपासाठी अडचणीची बाब ठरताना दिसत आहे.
गुजरात खेडूत समाज ही राज्यातील शेतकºयांची सर्वात मोठी संस्था. त्या संघटनेचे नेते सागर राबडी म्हणाले की नर्मदेच्या सिंचनाच्या नावाने आमची सरकारने आतापर्यंत फसवणूकच केली. आमच्याऐवजी नर्मदेचे पाणी उद्योगांनाच दिले जात आहे. तेथील काही गावांत फेरफटका मारला असता लक्षात आले की गावांपर्यंत कॅनॉल गेला आहे. पण शेतीला पाणी मिळालेले नाही. कॅनॉलमधील सर्व पाणी गुजरात इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला (जीडब्लूआयएल)दिले जात आहे. ते पिण्यासाठी पाणी देण्याऐवजी उद्योगांना पाणीपुरवठा करीत आहेत, अशी तक्रार शेतकºयांनी केली.
शेतीसाठी पाणी मिळत नसल्याची तक्रार योग्य आहे, असे जीडब्लूआयएलच्या अधिकाºयानेही मान्य केले. पाणी आमच्यापर्यंत पोहोचण्याआधीच ते अनेक ठिकाणी पंपांनी खेचले जाते. त्यामुळे इथे पुरेसे पाणी येत नाही. कुठे पंप लावून पाणी खेचले जाते, यावर ५0 हजार किलोमीटर अंतरावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा नाही.
अर्थात काही ठिकाणी शेतकरी पंपाने पाणी खेचतात, ही वस्तुस्थिती आहे. सुरेंद्र नगरमध्ये अशी प्रकरणे उघडकीस आली आणि पोलिसांनी काही पंप हस्तगत केले, शेतकºयांवर गुन्हेही दाखल केले. पण सध्या निवडणुका असल्याने पोलीस असे पाणी खेचण्याकडे डोळेझाक करीत आहेत. पाण्याबाबत सुरेंद्र नगरप्रमाणेच बोटादमधील शेतकºयांची तक्रार आहे. दुसरी बाब म्हणजे पाणी शेतीपर्यंत पोहाचवण्याची बरीच कामे अपूर्ण आहेत. त्यासाठीचा खर्च शेतकºयांनी करायचा असतो. ते तो करायला तयार नाहीत, असे अधिकारी म्हणतात.
अर्थात सरदार सरोवर नर्मदा निगमने कामेच पूर्ण केलेली नाहीत. आमच्याकडे ते उगाच बोट दाखवत आहेत, अशी शेतकºयांची तक्रार आहेत. या संपूर्ण पट्ट्यात नर्मदेचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी मिळत नसल्याची तक्रार सरसकट आहे. एका गावातील काहींची भेट घेतली. एके काळी ते सारे भाजपाचे मतदार होते. त्यापैकी केवळ एकानेच आपण यंदा भाजपाला मत देणार असल्याचे सांगितले. बाकींच्याचा मूड मात्र वेगळा दिसला.