हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा अंत्यसंस्कारास नकार, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 02:28 PM2021-10-05T14:28:32+5:302021-10-05T14:29:01+5:30
लखीमपूर खीरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
लखीमपूर खीरी:उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात एका 19 वर्षीय शेतकऱ्याचाही मृत्यू झाला. त्याच्या अखेरच्या क्षणांमध्ये लव्हप्रीत सिंगने त्याच्या वडिलांना हॉस्पिटलच्या बेडवरुन फोन करुन लवकर येण्याची विनंती केली होती. पण, कुटुंबिये येईपर्यंत लव्हप्रीतचा मृत्यू झाला. रविवारी झालेल्या हिंसाचारात लव्हप्रीत आणि इतर तीन शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, ही कार केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा चालवत होता. यूपी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, 19 वर्षीय लव्हप्रीतच्या कुटुंबाने आज शवविच्छेदन अहवाल आणि आशिष मिश्राविरोधातील एफआयआरची प्रत मिळेपर्यंत अंतिम संस्कार करण्यास नकार दिला आहे.
लव्हप्रीतचे वडील म्हणाले, 'माझा मुलगा कारखाली चिरडला गेला... या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई अद्याप केलेली नाही. प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. लव्हप्रीतच्या दोन बहिणींना त्यांच्या एकुलत्या भावाच्या मृत्यूमुळे धक्का बसला आहे. कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून लव्हप्रीतने घर सोडले होते, पण तो परत आलाच नाही.'