आंदोलनावर शेतकरी ठाम, आता दिल्लीला घेरणार; चौथ्या दिवशीही तिढा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 02:46 AM2020-11-30T02:46:39+5:302020-11-30T07:04:39+5:30
चर्चेचा प्रस्ताव साफ धुडकावला
नवी दिल्ली : नव्या कृषी विधेयकाविराेधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदाेलनाची स्थिती तणावपूर्ण झाली आहे. चर्चेसाठी केंद्राने दिलेला प्रस्ताव आंदाेलकक शेतकऱ्यांनी धुडकावून लावला. त्यानंतर सरकारने पुन्हा त्यांना बुराडी येथे येण्याचे आवाहन केले असून केंद्रीय मंत्र्यांची उच्च स्तरीय समिती त्यांच्याशी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या आंदाेलनाचा तिढा चाैथ्या दिवशीही कायम हाेता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांसाेबत बुराडी येथील निरंकारी मैदानात पाेहाेचल्यावर चर्चेचा प्रस्ताव दिला हाेता. मात्र, संयुक्त किसान माेर्चाच्या प्रतिनिधींनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. प्रतिनिधींनी बैठकीमध्ये सरकारच्या प्रस्तवावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करतांना सांगितले, की चर्चेसाठी काेणतीही अट नकाे. दिल्लीचे पाचही प्रवेशद्वार आम्ही राेखून दिल्लीला घेराव टाकणार असल्याचे भारतीय किसान युनियनच्या पंजाब शाखेचे अध्यक्ष नेते सुरजीत फुल यांनी सांगितले.
सरकार चर्चेसाठी गंभीर नसल्याचा आरोप
स्वराज पार्टीचे नेते याेगेंद्र यादव म्हणाले, रस्ता अडवून जनतेला त्रस्त करण्याचा आमचा हेतू नाही. पण, सरकारने अटी घालून प्रस्ताव पाठवणे याेग्य नाही. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या प्रतिनिधींनी सरकार चर्चेसाठी गंभीर नसल्याचा आराेप केला.