शंभू सीमेवर शेतकऱ्यांना अडवले; अश्रुधुराचा मारा, अनेक जखमी, दिल्लीकडे निघालेल्या आक्रमक शेतकऱ्यांना रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 05:30 IST2024-12-07T05:29:37+5:302024-12-07T05:30:21+5:30

आंदोलन एक दिवस स्थगित

Farmers intercepted at Shambhu border Tear gas, many injured, stopped the aggressor peasants marching towards Delhi | शंभू सीमेवर शेतकऱ्यांना अडवले; अश्रुधुराचा मारा, अनेक जखमी, दिल्लीकडे निघालेल्या आक्रमक शेतकऱ्यांना रोखले

शंभू सीमेवर शेतकऱ्यांना अडवले; अश्रुधुराचा मारा, अनेक जखमी, दिल्लीकडे निघालेल्या आक्रमक शेतकऱ्यांना रोखले

शंभू/नवी दिल्ली : आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने पायी निघालेल्या १०१ शेतकऱ्यांना हरयाणाच्या शंभू सीमेवर पोलिसांनी अडथळे लावून रोखले. काही शेतकरी यावेळी आक्रमक झाले. त्यांनी अडथळे ओलांडण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. या संपूर्ण भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी काही शेतकरी जखमी झाल्याने संघटनांनी हे आंदोलन एक दिवस स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला.

शेतमालाच्या किमान हमीभावास कायदेशीर हमी मिळावी, ही या शेतकऱ्यांची मागणी आहे. केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे शेतकरी पायी दिल्लीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, शंभू सीमेवरील पुलावर पोलिसांनी लावलेल्या लोखंडी जाळ्या काही शेतकऱ्यांनी काढून नदीत टाकल्या. शेतकरी आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करत जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काही शेतकरी जखमी झाले आहेत. काही शेतकऱ्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

१०१ शेतकरी निघाले दिल्लीकडे पायी

११ गावांत इंटरनेट, एसएमएस बंद हरयाणा सरकारने अंबाला जिल्ह्यातील ११ गावांत इंटरनेट सेवा, तसेच बल्क एसएमएस सुविधा तात्पुरती बंद केली आहे.

■ यावेळी आक्रमक झालेल्या मोर्चेकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. यावेळी काही शेतकरी जखमी झाले आहेत. एक शेतकरी या मार्गावर असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर चढला. त्यावेळी येथे तैनात पोलिसांनी त्यास हसकावून लावले.

■ किमान हमी भावास कायदेशीर हमी देण्यासह इतर मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने पायी निघालेल्या शेतकऱ्यांनी आपला मोर्चा एक दिवसासाठी स्थगित केला. १०१ शेतकऱ्यांनी हा मोर्चा सुरू केल्यानंतर हरयाणा पोलिसांनी त्यांना सीमेवर अडवले.

अडवण्याचा प्रकार निषेधार्ह : राहुल गांधी 

दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रकार निषेधार्ह • असल्याचे नमूद करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला आवाहन केले. या शेतकऱ्यांच्या मागण्यांची गांभीयनि दखल घेत त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी, असे राहुल यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये नमूद केले.

शेतकरी आपल्या वेदना मांडण्यासाठी दिल्लीत येऊ इच्छित आहेत. 3 त्यांच्यावर अश्रुधुराचा व बळाचा वापर करणे निषेधार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे पूर्वी शेतकरी आंदोलनांत शहीद झालेल्या ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा देशाला अजून विसर पडलेला नाही, असेही राहुल यांनी म्हटले आहे.

दिल्ली सीमेवरही बंदोबस्त वाढवला 

हरयाणातून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता दिल्ली सीमेवर सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला असून, संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे.
 

Web Title: Farmers intercepted at Shambhu border Tear gas, many injured, stopped the aggressor peasants marching towards Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.