लखीमपूर हिंसाचाराप्रकरणी शेतकऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र, केंद्रावर केले गंभी आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 01:15 PM2021-10-04T13:15:23+5:302021-10-04T13:15:32+5:30
Lakhimpur Kheri Violence:संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
लखीमपूर:उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्याच्या मुलामध्ये झालेल्या संघर्षानंतर झालेल्या हिंसक घटनेत 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामुळे विरोधी पक्ष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. यातच आता संयुक्त किसान मोर्चाने या प्रकरणाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
या पत्रात गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी, त्यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करणे, तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पत्रात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर हिंसा भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यांना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकावे असेही या पत्रात म्हटले आहे.
'उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारचे षड्यंत्र'
संयुक्त किसान मोर्चाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेल्या पत्रात केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप करण्यात आले आहेत. 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खीरीमध्ये दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना तुडवून ठार मारण्याची घटना निंदनीय आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनींच्या सहकाऱ्यांसह त्यांच्या मुलाने क्रुरपणे हल्ला केला. हा केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा मोठा कट आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
यूपी सरकारने पंजाबला पत्र लिहिले
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने पंजाबच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून राज्याला विनंती केली की कोणालाही लखीमपूर खीरीला जाऊ देऊ नका. काल लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात 9 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सीआरपीसीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या शेजारील राज्यांच्या सीमेवर सखोल तपासणी मोहीम राबवली जात आहे. अशा स्थितीत, डीएनडी टोल प्लाझावर दिल्लीच्या बाजूने यूपीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांना तपासणी केल्यानंतरच यूपी सीमेत प्रवेश दिला जात आहे.