तेलंगणात शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 15:30 IST2023-08-03T15:27:42+5:302023-08-03T15:30:09+5:30
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचे कल्याण आणि कृषी विकास हे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला.

तेलंगणात शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे निर्देश
हैदराबाद : शेतकरी कर्जमाफी कार्यक्रम ३ ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचे कल्याण आणि कृषी विकास हे राज्य सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार केला.
अनेक आव्हानांचा सामना करूनही सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे आलेली आर्थिक मंदी, कोरोना महामारीचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, एफआरबीएम निधी न जारी करून तेलंगणा राज्याप्रति केंद्राने दाखविलेली सूडबुद्धीची वृत्ती, यामुळे राज्याची वित्तीय तूट वाढली. परिणामी, शेतकरी कर्जमाफी योजनेला विलंब झाला.
राज्याची आर्थिक परिस्थिती सदृढ असताना मुख्यमंत्री केसीआर यांनी शेतकरी कर्जमाफी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवर प्रगती भवन येथे उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत राज्याचे अर्थमंत्री टी. हरीश राव, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार सोमेश कुमार, अर्थ विभागाचे विशेष मुख्य सचिव रामकृष्ण राव, एचएमडीएचे प्रधान सचिव अरविंद कुमार आणि कृषी सचिव रघुनंदन राव यांची उपस्थिती होती.
आणखी १९,००० कोटी रुपयांची आवश्यकता
मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, त्यांनी दिलेल्या वचनानुसार सरकार शेतकरी कर्जमाफी योजना राबवत आहे. आधीच माफ केलेल्या कर्जानंतर, प्रलंबित शेती कर्ज माफ करण्यासाठी आणखी १९,००० कोटी रुपयांची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफीचा कार्यक्रम सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री केसीआर यांनी दिल्या आहेत.