शेतकऱ्यांची मोर्चा उद्या दिल्लीच्या दिशेनं रवाना होणार; सुरक्षा वाढवली, इंटरनेट सेवा स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 12:08 PM2024-02-20T12:08:22+5:302024-02-20T12:11:44+5:30
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्ग ४४ बंद आहे.
नवी दिल्ली: पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान, सोमवारी शंभू सीमेवर शेतकरी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावला. शेतकऱ्यांनी २१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता दिल्लीकडे कूच करण्याची तयारी केली आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्ग ४४ बंद आहे. मार्कंडा नदी पुलाजवळ सीलबंद महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था शिथिल करण्याऐवजी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसेच अनेक भागात इंटरनेट सुविधा देखील बंद करण्यात आली आहे. सरकारसोबत शेतकऱ्यांच्या बैठकीत सकारात्मक परिणाम न झाल्याने सुरक्षा दल अधिक सतर्क झाले आहे. दातासिंगवाला हद्दीतील शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. हरियाणातूनही अनेक शेतकरी पंजाबच्या सीमेवर पोहोचले आहेत. हळूहळू शेतकऱ्यांचा ताफा वाढत आहे. यावेळी महिलांची संख्याही वाढत आहे. स्त्रिया आपल्या मुलांची जबाबदारी घेत आहेत.
२१ फेब्रुवारीला दिल्लीकडे रवाना होणार-
२१ फेब्रुवारीला आम्ही दिल्लीकडे कूच करणार आहोत, असे शेतकरी नेते पढेर सांगतात. सरकारसोबत सध्या कोणतीही बैठक होणार नाही. मात्र आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत. डल्लेवाल म्हणाले की, आम्ही सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या मान्य करा किंवा आम्हाला दिल्लीत शांततेने बसू द्या. आम्ही सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की, हिंसाचार करू नका.