शेतकरी सभा अकोल्यात? नेत्यांचा अंतर्गत वाद सुरू, १८ रोजी रेल्वे रोको; टिकैत राज्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 05:48 AM2021-02-16T05:48:55+5:302021-02-16T05:49:19+5:30
Farmers meeting in Akola? : टिकैत यांच्या हरियाणा आणि उत्तर प्रदेशात लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सभा होत आहे.
- विकास झाडे
नवी दिल्ली : २० फेब्रुवारीला यवतमाळात ठरलेली शेतकऱ्यांची महापंचायत आता अकोल्यात होऊ शकते. यामुळे शेतकरी नेत्यांमध्येच अंतर्गत वाद सुरू आहेत.
भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत हे २० फेब्रुवारी रोजी यवतमाळात येऊन कृषी कायदा किती घातक आहेत याबाबत मार्गदर्शन करणार होते. टिकैत यांच्या हरियाणा आणि उत्तर प्रदेशात लाखो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सभा होत आहे. महाराष्ट्रातही तशीच गर्दी व्हावी म्हणून महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चाने यवतमाळसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी संदीप गिड्डे पाटील, प्रतिभा शिंदे, डॉ. अशोक ढवळे, शंकर दरेकर, विवेकानंद महात्मे आदी विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जोरात कामाला लागले आहेत. परंतु ऐन वेळेवर भारतीय किसान युनियनचे महासचिव युधवीर सिंग यांनी ही सभा यवतमाळात न घेता अकोला इथे घ्या, असे फर्मान सोडले आहे. त्यामुळे शेतकरी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. तरीही ही सभा यवतमाळातच व्हावी, असा आग्रह महाराष्ट्र संयुक्त किसान मोर्चाचा आहे. युधवीर सिंग यांनी ऐकले नाही तर अकोला येथील सभेला गर्दी होणार नाही, असे एका कार्यकर्त्याने सांगितले.
उच्चस्तरीय चौकशी व्हावी
- २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात अनेक शेतकऱ्यांना गोवण्यात आले आहे.
- पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. परंतु शेतकऱ्यांवर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून करण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी केली.
- अद्यापही १२५ शेतकरी नेते तुरुंगात डांबले आहेत. २७ शेतकरी बेपत्ता आहेत. उद्या आंदोलक शेतकरी सीमांवर छोटूराम जयंतीचा कार्यक्रम साजरा करतील, तर १८ फेब्रुवारीला दुपारी १२ ते ४ पर्यंत रेल्वे रोको केले जाईल.