शेतकऱ्यांची सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली, आज भारत बंदची हाक; ट्रक आणि कामगार संघटनांचाही सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 07:51 AM2024-02-16T07:51:56+5:302024-02-16T08:02:47+5:30
शेतकऱ्यांची सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. यामुळे आता देशभरात आज भारत बंदची हाक दिली आहे.
एमएसपी वरील कायदेशीर हमी म्हणजेच किमान आधारभूत किंमत यासह अनेक मागण्यांसह हजारो शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान, संयुक्त किसान मोर्चासह अनेक शेतकरी संघटनांनी आज शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. आपल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकरी संघटनांनी आज भारत बंद पुकारला आहे. संयुक्त किसान मोर्चाने सर्व समविचारी शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या १६ फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या भारत बंदचा ग्रामीण भागात अधिक परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे. भारत बंदबाबत दिल्ली-एनसीआर ते पंजाब-हरियाणापर्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे.
शेतकरी आंदोलकांना हरियाणा-पंजाबच्या वेगवेगळ्या सीमेवर रोखण्यात आले आहे. हरियाणा पोलीस आणि सुरक्षा दलांनी आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनीही आपल्या सीमा मजबूत केल्या आहेत.
संयुक्त किसान मोर्चाने सर्व समविचारी शेतकरी संघटनांना एकत्र येऊन भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दिवसभर आंदोलन सुरू राहणार आहे. आता या भारत बंदमध्ये काय बंद राहणार आणि काय खुले राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकरी संघटनांच्या देशव्यापी भारत बंदमुळे वाहतूक, कृषी उपक्रम, खासगी कार्यालये, गावातील दुकाने आणि ग्रामीण औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील संस्था आज बंद राहण्याची शक्यता आहे.
देशभरातील शेतकरी भारत बंदमध्ये सामील होत आहेत, त्यामुळे दिल्ली आणि यूपीच्या गाझीपूर सीमेवरही अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारत बंदबाबत शेतकरी संघटना यूपी गेटपर्यंत पोहोचणार असल्याचं बोललं जात आहे, अशा परिस्थितीत गाझीपूर सीमेवर कडक तयारी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये अनेक ट्रक संघटना आणि कामगार संघटनाही सहभागी होत आहेत.