देशभरातील शेतकरी संघटना येत्या 20 नोव्हेंबरला दिल्लीत धडकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 08:55 PM2017-11-09T20:55:06+5:302017-11-09T21:10:39+5:30
नवी दिल्ली : सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभावाचं आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटना एकवटल्या असून येत्या 20 नोव्हेंबरला सर्व शेतकरी दिल्लीत धडकणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीसह 180 शेतकरी संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत.
आज यासंदर्भात विविध राज्यातील शेतकरी नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह योगेंद्र यादव उपस्थित होते. महाराष्ट्रासह देशातील विविध भागातील शेतकरी नरेंद्र मोदी सरकारवर नाराज आहेत. वर्षभरापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी व योग्य हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अद्यापही पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, कर्जमाफी आणि हमीभावावरुन शेतकऱ्यांनी देशभरात अनेक आंदोलने केली. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या अखिल भारतीय किसान समितीने हमीभावासाठी मंदसौरमधून मोठी पदयात्रा काढली होती. यावेळी येथील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. याविरोधात किसान संघर्ष समितीने देशभरात 10 हजार किलोमीटरची ही पदयात्रा काढली होती. या पदयात्रेची सांगता दिल्लीत होणार आहे.