विधानसभा निवडणुकीआधी शेतकरी संघटनांची मोठी घोषणा; पुन्हा आंदोलन करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 07:39 PM2022-01-15T19:39:28+5:302022-01-15T19:39:56+5:30
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असतानाच आता शेतकरी संघटनांनी देखील मोठी घोषणा केली आहे.
नवी दिल्ली-
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असतानाच आता शेतकरी संघटनांनी देखील मोठी घोषणा केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ३१ जानेवारी रोजी शेतकरी संघटना केंद्र सरकारविरोधात पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. ३१ जानेवारीचा दिवस सरकारविरोधात विश्वासघात दिवस म्हणून पाळला जाणार आहे. यात देशभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्र सरकार विरोधात पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जाणार आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी २१ जानेवारी रोजी ३ ते ४ दिवसांसाठी उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचा दौरा करणार असल्याचंही जाहीर केलं आहे. यात पीडीत शेतकरी कुटुंबीयांची भेट राकेश टिकैत घेणार आहेत. तसंच आंदोलनाची पुढची रणनिती ठरविण्यात येणार असल्याचंही टिकैत यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारनं अद्याप एमएसपीसाठी कोणतीही समिती अद्याप स्थापन केलेली नाही. तसंच कुणीही आमच्याशी संपर्क केलेला नाही. लखीमपूर खीरी हत्याकांडात सहभागी असलेल्या राज्यमंत्र्यावरही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सरकारनं जर आमच्या मागण्यांवर उत्तर दिलं नाही. तर आम्ही ३१ जानेवारी रोजी विश्वासघात दिवस साजरा करू, असं भारतीय किसान संघाचे नेते युद्धवीर सिंह यांनी सांगितलं.
पंजाब निवडणुकीवरही चर्चा
शेतकरी संघटनांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. निवडणूक लढणाऱ्या शेतकरी नेत्यांनी संयुक्त मोर्चातून बाहेर पडावं असं काहींचं म्हणणं आहे.
तीन कृषी कायदे रद्द करण्यात आल्यानंतर इतर मागण्यांवर सहमतीनंतर ११ डिसेंबर २०२१ रोजी संयुक्त मोर्चानं आंदोलन संपुष्टात आणून घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर १५ जानेवारी रोजी पुन्हा बैठक घेत शेतकरी संघटनांनी सरकारनं दिलेल्या आश्वासनांवर केल्या गेलेल्या कामाची समिक्षा केली गेली होती.