पाटणेतील शेतकरी आक्रमक
By Admin | Published: December 12, 2015 12:21 AM2015-12-12T00:21:52+5:302015-12-12T00:25:11+5:30
दोन वर्षे कारवाईच नाही : गूळ व्यापाऱ्यांकडून बारा लाखांचा गंडा
कोल्हापूर : गूळ घालून दोन वर्षे उलटले तरी अद्याप व्यापाऱ्यांकडून एक दमडीही हातात पडलेली नसल्याने हवालदिल झालेल्या पाटणे (ता. शाहूवाडी) येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी समिती प्रशासनाला धारेवर धरले. केवळ कर गोळा करण्यासाठीच समिती आहे काय? गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई काय केली? अशी विचारणाही शेतकऱ्यांनी केली.
पाटणे येथील बारा शेतकऱ्यांनी स्वामी समर्थ ट्रेडर्स व गणेश ट्रेडर्स यांच्या अडत दुकानात गूळ विक्रीसाठी लावला होता. डिसेंबर २०१३ मध्ये गुळाची विक्री झाली; पण अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळालेले नाहीत. याबाबत बाजार समितीकडे लेखी तक्रारीनंतर समितीने संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा काढून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली; पण व्यापाऱ्यांनी पोबारा केला. शेतकऱ्यांनी दबाब वाढविल्यानंतर समितीने परवाना देताना तारण दिलेल्या मालमत्तेवर बोजा चढविला; पण महसुली कारवाई करण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने तसा प्रस्तावही समितीने दिला आहे; पण अद्याप कारवाई झालेली नाही. शुक्रवारी सभापती परशराम खुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या शेतकऱ्यांना घातला गंडा
शेतकऱ्याचे नावरुपये
तातोबा ठमके ४,२७५
शीला कृष्णात पाटील१,१६,८५०
धोंडिराम कृष्णात पाटील५१,८७०
सचिन पाटील४५,३१५
प्रदीप पाटील३,२०,६२५
गोरक्ष पाटील७७,८०५
युवराज पाटील२३,३७०
आनंदा थोरात १६,२४५
हौसाबाई बंडू माने ४२,७५०
शेतकऱ्याचे नावरुपये
नामदेव पाटील१९,९५०
अशोक पाटील १४,२५०
संग्राम पाटील२९,९२५
राजाराम पाटील३३,३४५
निरंजन पाटील६५,८३५
आप्पासाहेब पाटील१७,६७०
सुमन पाटील६८,९७०
बाबासाहेब पाटील १,४९,६२५
लालासाहेब पाटील९८,३२५
स्वामी समर्थ ट्रेडर्स व गणेश ट्रेडर्स या फर्मशी संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. संबंधितांच्या तारण मालमत्तेवर बोजा चढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सप्टेंबर महिन्यातच प्रस्ताव दिलेला आहे.
- परशराम खुडे (सभापती, बाजार समिती)
आमच्या पैशांसाठी आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता, तरीही दखल घेतलेली नाही. कर्जावरील व्याजाने आमचे कंबरडे मोडले आहे.
- आनंदराव थोरात (शेतकरी, पाटणे)