Farmers protest: दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 15 FIR; CCTVच्या सहायाने घेतला जातोय समाज कंटकांचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 10:18 AM2021-01-27T10:18:54+5:302021-01-27T10:21:38+5:30
राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनप्रसंगी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दिल्लीच्या अनेक भागांत हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांचा पोलीस शोध घेत आहेत. यातच गँगस्टर लक्खा सिंह सिधाना चेही नाव समोर येत आहे.
नवी दिल्ली - केंद्राने तयार केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रजासत्ताक दिनी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर दिल्लीला छावणीचे स्वरूप आले आहे. येथील संवेदनशील भागांत पोलिसांसोबतच CRPFच्या 15 कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत. या हिंसाचारात 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर ट्रॅक्टर उलटल्याने एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत 15 FIR नोंदविण्यात आल्या आहेत.
राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनप्रसंगी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दिल्लीच्या अनेक भागांत हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांचा पोलीस शोध घेत आहेत. यातच गँगस्टर लक्खा सिंह सिधाना चेही नाव समोर येत आहे. लक्खा सिधाना आणि त्याच्या सहकाऱ्यांचा मध्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारात हात असल्याचा आरोप आहे. आता दिल्ली पोलीस याचा तपास करत आहेत.
या हिंसाचार प्रकरणी 15 FIR नोंदविण्यात आल्या असून त्यातील 5 FIR ईस्टर्न रेन्जमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत. याशिवाय नजफगड, हरिदास नगर आणि उत्तम नगरमध्ये प्रत्येकी एक एफआयआर नोंदविण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या हिंसाचारानंतर गृह मंत्रालयाने दिल्लीच्या काही भागांत इंटरनेट सेवा बंद केली आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमाने पोलीस तपास -
दिल्ली पोलीस आता सीसीटीव्ही फुटेडच्या माध्यमाने निदर्शनकर्त्यांचा शोध घेत आहे. यासाठी, लाल किल्ला, नांगलोई, मुकरबा चौक आणि सेंट्रल दिल्लीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज काढण्यासाठी स्पेशल सेल आणि क्राइम ब्रांचची मदत घेतली जात आहे. यात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर, लाल किल्ल्यावर चढणाऱ्यांवर आणि सरकारी संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असेल. याच बरोबर, ज्यां नेत्यांनी शेतकऱ्यांना भडकावले अशा नेत्यांवरही पोलिसांची नजर असणार आहे.