Farmers Protest: ६ फेब्रुवारीला 'चक्का जाम', जे जे रस्त्यात अडकणार त्यांना...; टिकैत यांची 'अनोखी' घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 05:54 PM2021-02-04T17:54:09+5:302021-02-04T17:55:14+5:30
Farmers Protest: कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; ६ तारखेला ३ तास चक्का जाम
नवी दिल्ली: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७० दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्यावरही या प्रश्नी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता भारतीय किसान युनियननं चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे. ६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.
शेतकरी आंदोलन कसं संपवावं लागेल? माजी पंतप्रधानांनी सांगितला मोठा मार्ग
६ फेब्रुवारीला राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर चक्का जाम करण्यात येणार आहे. दिल्लीसोबतच दिल्लीच्याबाहेर चक्का तीन तासांसाठी चक्का जाम केला जाईल, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली. 'चक्का जाम आंदोलनावेळी वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना पाणी आणि जेवण देण्यात येईल. सरकार आमच्यासोबत कशा प्रकारचं वर्तन करतंय याची माहितीदेखील आम्ही वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना प्रवाशांना देऊ,' असं टिकैत यांनी सांगितलं.
There'll be a three-hour-long 'chakka jaam' on 6th Feb. It won't take place in Delhi but everywhere outside Delhi. The people that will be stuck in it will be given food and water. We will tell them what is the Govt doing with us: Rakesh Tikait, Bharatiya Kisan Union #FarmLawspic.twitter.com/y0matN2t2A
— ANI (@ANI) February 4, 2021
कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. त्यावेळी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. दिल्लीच्या काही भागांमध्ये हिंसाचार झाला. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यांची अद्याप सुटका झालेली नाही. त्यांची सुटका करण्याची मागणी टिकैत यांनी केली. शेतकरी आंदोलन करत असलेल्या भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे याकडेदेखील त्यांनी लक्ष वेधलं.
भारतीय किसान संघाचा पाठिंबा नाही.
टीम इंडियाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर झाली चर्चा - विराट कोहली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारतीय किसान संघानं चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. 'दिल्लीच्या सीमावर्ती भागांत सुरू असलेलं आंदोलन पूर्णपणे राजकीय झालं आहे. हे आंदोलन राजकीय अजेंड्याचा भाग आहे. कॅनडा, ब्रिटिशमधील राजकीय नेते, काही सेलिब्रिटी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे हे आंदोलन म्हणजे भारताविरोधात सुरू असलेला अजेंडा आहे. यामुळे देशाच्या शांततेला धोका निर्माण झाला आहे,' असं भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय सचिव बद्री नारायण चौधरींनी सांगितलं.