दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून 'रामायण' पठण; ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन आणखी शेतकरी रवाना
By मोरेश्वर येरम | Published: December 12, 2020 02:32 PM2020-12-12T14:32:54+5:302020-12-12T14:39:38+5:30
दिल्ली आणि नोएडामध्ये असलेल्या चिल्ला सीमेवर तर शेतकऱ्यांनी सरकारला सदबुद्धी यावी यासाठी शेतकऱ्यांनी चक्क होमहवन देखील केला आहे.
दिल्ली
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन आता आणखी तीव्र झालं आहे. जयपूर-दिल्ली आणि दिल्ली-आग्रा हायवे शेतकरी आज बंद करणार आहेत. तर दिल्ली पोलिसांनी सीमेवरील सुरक्षेत वाढ केली आहे. पंजाब आणि हरियाणासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणखी शेतकरी दिल्लीकडे रवाना होत आहेत.
दिल्ली आणि नोएडामध्ये असलेल्या चिल्ला सीमेवर तर शेतकऱ्यांनी सरकारला सदबुद्धी यावी यासाठी शेतकऱ्यांनी चक्क होमहवन देखील केला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी 'रामायण' पठणाचा कार्यक्रम देखील घेतला आहे. चिल्ला सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
ताज्या माहितीनुसार टिकरी आणि धानसा सीमेवर देखील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तर झाटीकारा सीमेवर फक्त दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे.
ट्रॅक्टर आणि ट्रॅकमधून शेतकरी
पंजाब आणि हरियाणासह इतर अनेक ठिकाणांहून शेतकऱ्यांचे लोंढे आता दिल्लीच्या सीमेवर पोहोचत आहेत. ट्रॅकमध्ये बसून अनेक शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.