Farmers protest in Delhi : मोदी आणि शाह म्हणजे दुर्योधन आणि दु:शासन, सीताराम येचुरींची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 04:07 PM2018-11-30T16:07:59+5:302018-11-30T16:10:18+5:30
शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी आज राजधानी नवी दिल्लीत धडकले आहेत.
नवी दिल्ली - शेतमालाला दीडपट हमीभाव, कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी देशभरातील हजारो शेतकरी आज राजधानी नवी दिल्लीत धडकले आहेत. दरम्यान, या शेतकऱ्यांना संबोधित करताना सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मोदी आणि शाह म्हणजे आजच्या काळातील दुर्योधन आणि दु:शासन आहेत, असे येचुरी यांनी म्हटले. तसेच भाजपा आणि संघाकडे निवडणूक जिंकण्यासाठी केवळ राम मंदिराचा मुद्दाच शिल्लक राहिला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
शेतकऱ्यांना संबोधित करताना येचुरी म्हणाले, ''नरेंद्र मोदी आणि आरएसएसकडे आता केवळ राम मंदिर हा एकच मुद्दा उरला आहे. त्यामुळे निवडणूक जवळ आल्यावर त्यांनी राम नामाचा जप सुरू केला आहे." दरम्यान, राजधानीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गर्दी केली आहे. यावेळी स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी ''नरेंद्र मोदी, किसान विरोधी'' हा नारा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावा, असे आवाहन केले.
CPI (M)'s Sitaram Yechury at farmers’ protest in Delhi: BJP, Modi & RSS have only one weapon in hand that is Ram Temple. As the elections are approaching, they have started chanting ‘Ram Ram’. pic.twitter.com/D3Ht1rOeuT
— ANI (@ANI) November 30, 2018
देशाच्या कानाकोपऱ्यातून रामलीला मैदानावर आलेले शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा आज संसदेवर धडकणार असून या पार्श्वभूमीवर संसदेच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा 208 संघटनांचे सदस्य शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, सरकार शेतकऱ्यांचे हित पाहत नाही. साखर कारखाने ठरल्याप्रमाणे पैसे देत नाहीत. उत्पादन खर्च वाढला आहे. कृषी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असा आक्रोश शेतकरी संघटनांचा आहे.
शेतकऱ्यांच्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी दिल्लीतील डॉक्टर, वकील, प्राध्यापक, कलाकार मोठ्या संख्येने पुढे आले आहेत. नेशन फॉर फार्मरच्या सहाशे ते सातशे स्वयंसेवकांनी शेतकऱ्यांना साथ देत रामलीला मैदानाच्या दिशेने पायी कूच केली. यातील काही डॉक्टरांनी शेतकऱ्यांसाठी मैदानावर आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले आहे.