Farmers Protest: दिल्लीत राजपथावर देशाचे शक्तिप्रदर्शन; शेवटचा ट्रॅक्टर संपेपर्यंत ही रॅली सुरू राहील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 03:10 AM2021-01-26T03:10:19+5:302021-01-26T07:25:39+5:30
रॅलीमध्ये केवळ पाच हजार लोक असावेत असे पोलीस आणि शेतकऱ्यांच्या चर्चेअंती ठरले असले तरी लाखो शेतकरी यात सहभागी होत आहेत.
विकास झाडे
नवी दिल्ली : दिल्लीच्या तीन सीमेवरून शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघत आहे. त्यात टीकरी, सिंघू आणि गाझीपूर या तीन सीमांचा समावेश आहे. शासकीय परेड आटोपल्यानंतर शेतकऱ्यांची रॅली सुरू करावी, अशा प्रशासनाच्या सूचना असल्या तरी सकाळी ९ वाजता शेतकरी रॅलीला सुरुवात करणार आहेत. जवळपास ३७० कि.मी.च्या परिघात ही रॅली असेल. यात कवायतीपासून देशप्रेमावर आधारित विविध कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे शेवटचा ट्रॅक्टर संपेपर्यंत ही रॅली सुरू राहील. त्यासाठी तीन दिवस लागू शकतात.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज दोन महिने झालेत. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि एमएसपी कायदा लागू करावा म्हणून दिल्लीतील सहा सीमा अडवल्या आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अकरा बैठका होऊनही कोणताही तोडगा निघू शकला नाही. एक महिन्याभरापूर्वीच शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. प्रशासनाने मान्यता दिल्याप्रमाणे उद्या तीन सीमांवरून प्रचंड रॅली निघत आहे.
टीकरी सीमेहून ११० कि.मी. तर सिंघू सीमेहून ९० कि.मी. रॅली काढली जाणार आहे. गाझीपूर सीमेवरून निघणाऱ्या रॅलीचा परिघ हा जवळपास ७० कि.मी. असेल. पलवलचे शेतकरी टीकरी सीमेवर जातील तर शहाजापूरचे शेतकरी गाझीपूर सीमेवर पोहोचले आहेत. ज्या सीमेवरून ही रॅली सुरू होईल तिथेच परत येणे बंधनकारक आहे. या रॅलीवर दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा पोलिसांची नजर असणार आहे. रॅलीदरम्यान कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी सावधानता बाळगली जाणार आहे. रॅली सुरू होण्याची वेळ दुपारी १२ची आहे. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी सकाळी ९ वाजता रॅली सुरू करणार आहेत. ही रॅली संपायला तीन दिवस लागू शकतात, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. रॅलीमध्ये केवळ पाच हजार लोक असावेत असे पोलीस आणि शेतकऱ्यांच्या चर्चेअंती ठरले असले तरी लाखो शेतकरी यात सहभागी होत आहेत. त्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
यंदा राजपथवर नसेल विदेशी पाहुणा!
प्रजासत्ताकदिनी राजपथवर विदेशातील पाहुणे हजेरी लावतात. त्यांना देशाच्या प्रगतीचे दर्शन होते. परंतु उद्या कोणताही विदेशी पाहुणा नसणार आहे. कोरोनामुळे यंदा पाहुणे रद्द झालेत. याआधी १९५२, १९५३ आणि १९६६मध्ये विदेशी पाहुणे विविध कारणाने अनुपस्थित होते.
लवकरच आंदोलन संपेल!
उद्या शेतकऱ्यांच्या रॅलीवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु शेतकऱ्यांसोबत सरकारची सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच हे आंदोलन संपुष्टात येईल असे संकेत त्यांनी दिलेत.
संसदेला घेराव!
आज संयुक्त किसान मोर्चाची बैठक झाली. त्यात १ फेब्रुवारी रोजी संसदेला शेतकरी घेराव घालणार आहेत. आहे त्या सीमेहून शेतकरी चालत संसदेकडे येतील.